|| भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी ||
सुमारे आठशे वर्षांपूर्वी महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा अवतार झाला. गुजराथ राज्यात भडोच नगरात विशाळदेव नावाचा प्रधान राज्य कारभार सांभाळत असे.त्याच्या पत्नीचे नाव माल्हनीदेवी असे होते. या दाम्पत्याच्या उदरी हरीपाळदेवाचा जन्म झाला. सर्वांना अपार आनंद झाला. हरीपाळाचं बालपण कोडकौतुकात गेले. हरीपाळदेव हा फार सुंदर होता. पुढे त्याने अनेक शस्त्रास्त्र विद्या, वेद विद्यादींचे शिक्षण घेतले.
तो सर्वांचा लाडका, प्रजाहितदक्ष आणि शूरवीर होता. ‘कमला’ नावाच्या एका कुलीन, सुंदर, सुशील मुलीबरोबर त्याचे लग्न झाले. त्याला महिपालदेव नावाचा एक सुंदर मुलगा झाला. सांसारीक जीवन पूर्णतृप्त आनंदात व्यतीत होत असताच, गुजरातवर देवगिरीच्या सिंघणदेव यादवाने आक्रमण केले. वयाच्या २५/२६ व्या वर्षी ते
आक्रमण परताऊन लावण्याचा पराक्रम हरीपाळदेवाने केला.मिळालेलं हे यश पाहून राज्याचा भावी राजा म्हणून त्याला सर्वजण आदराने पाहू लागले.परंतु त्यानंतर अल्पशा आजाराने हरीपाळ आजारी पडला आणि त्यातच त्याचा आकस्मिक मृत्यू झाला. राजपरिवार आणि सर्व प्रजाजन हळहळले सर्वत्र दुःखाचा आक्रोश पसरला.
मोठ्या जड अंतःकरणाने, दुःखावेगात अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. नर्मदेच्या राजघाटावर अंत्ययात्रा आली.चंदनाच्या चितेवर हरीपाळदेवाचे कलेवर ठेवण्यात आले.पिता विशाळ देवावर आपल्या प्रिय पुत्राला भडाग्नी देण्याची पाळी आली होती. पुत्र मुख शेवटचे पहावे म्हणून विशाळदेव सामोरे आले आणि पाहतात तो हरीपाळदेवांच्या डोळ्यांची हालचाल त्यांना दिसली,ते आनंदाने आणि आश्चर्याने ओरडलेच कुमरु जीआला ! कुमरु जीआला !!
हे शब्द ऐकून सर्व जन आश्चर्य चकित झाले,आणि सर्वत्र आनंदसागर पसरला. हरीपाळदेव जीवंत आहे, हरीपाळदेव जीवंत आहे,
ही चर्चा सर्वत्र सुरू झाली. हरीपाळाची हालचाल सुरू झाली त्यांना चितेवरून उठवून पालखीत बसवून वाजतगाजत नगराकडे आणले आणि राजवाड्यातून गेलेली शोक यात्रा आता आनंद यात्रेत परिवर्तीत होऊन राजवाड्यात परत आली. सर्व प्रजा जनाला आनंद झाला. पिता विशाळदेव, माता माल्हनीदेवी,पत्नी कमलाराणी आणि लहानगा पुत्र महिपाळदेव यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला. सर्व काही पूर्ववत सुरू झाले. पूर्वीचाच हरीपाळदेव जीवंत झाला असे सर्वांना वाटले, परंतु विशाळ देवांना मात्र दाटसंशय वाटू लागला की,
हा पूर्वीचाच हरीपाळ नाही. कुणीतरी सिद्ध साधकांने हरीपाळाच्या शरीरात परकाया प्रवेश केला असावा. प्रथम विशाळदेवाने आपले गृप्त हेर पाठवून दऱ्या, डोंगराच्या कपारी,गुहा,गुंफा आदी ठिकाणी शोधून काढले, पण कुढेही असा कोण्या सिध्दसाधकाचा देह पडलेला दिसला नाही. नंतर त्याने आपल्या पत्नीला आणि हरीपाळाच्या पत्नीला सांगून त्याच्या बालपणातील किंवा एकांतातील प्रसंगाचे त्याला स्मरण आहे, की नाही हे तपासून पहायला सांगितले. बालपणीच्या खेळणे आदी वस्तू त्याला विचारताच हरिपाळ देवाने सर्व काही व्यवस्थित सांगितले.सर्वांची खात्री झाली की, हा पूर्वीचाच हरिपाळदेव आहे. त्याप्रमाणे सर्वकाही सुरळीत राज्यकारभार सुरू झाला.
परंतु हा पूर्वीचाच हरिपाळ नव्हता तर हरिपाळ देवाच्या शरीरात द्वारकेचे श्री चक्रपाणि महाराज यांनी परकाया प्रवेश केला होता .कामाख्या हटयोगिनीच्या रती सुखाच्या आग्रहाखातर श्री चक्रपाणी महाराजांनी आपले शरीर त्यागून हरिपाळ देवाच्या शरीराचा स्वीकार केला होता. हा नवा असा परमेश्वराचा पतितोद्धारक अवतार म्हटल्या जातो. परमेश्वर अवतार धारण करतात तेव्हा तीन परीने अवतार धारण करतात. १) गर्भ, २) दवडणे, ३) पतीत. १) गर्भातही परमेश्वर अवतार धारण करतात.२) एखाद्याच्या शरीरातील जीवाला काढून तेथे स्वयं अवतार धारण करतात.
३) पतीत, शरीरातून जीव गेला म्हणजे त्या पडलेल्या शरीराचा स्विकार करणे हा पतीतोद्धारक अवतार.
या हरीपाळाने पूर्वीच्या हरीपाळाच्या सर्वकाही सवयी स्वीकारल्या गोपाळ,मंत्री दीक्षा, गोपाळणी अन् द्यूत क्रीडा, पत्नीवर प्रेम या सर्व त्याच्या गुणधर्माचा स्वीकार करून काही दिवस हरिपाळदेव गुजरात राज्याचे कार्य करीत राहिले, परंतु तेथे त्यांचे मन रमेना. हे सर्व सोडून एक दिवस आपण महाराष्ट्रात जिवोद्धार कार्य करण्यासाठी निमित्त शोधले पाहिजे म्हणून त्यांनी एकदिवस द्यूतक्रिडेत अमाप धन, द्रव्य हरले.त्यामुळे जुआरीयांकडून उसने धन द्रव्य घेऊन हार स्विकारण्याची प्रवृत्ती धारण केली
आणि त्यांना ते उसने घेतलेले द्रव्य देण्यासाठी आपल्या पत्नीला अलंकार मागितले. तिने नकार दिल्यामुळे हरिपाळ देवांनी उदासीनता स्वीकार केली आणि देणे दिल्याशिवाय अन्न ग्रहण करणार नाही, अशा प्रकारे व्रत धारण केले. शेवटी विशालदेवाला हे सर्व समजले आणि त्यांनी देणेकरीयांचे देणे दिले, परंतु त्या दिवसापासून हरिपाळ देवांनी कमळाराणीविषयीची खंती स्वीकारून उदासीनता स्वीकार केली,संसारात त्यांचे मन रमेना आणि एक दिवस त्यांनी घरदार सोडण्यासाठी रामटेक यात्रेचे निमित्त शोधले.
राज्यवैभव सोडण्याचा निश्चय पक्का केला. मला राम यात्रेला जाऊ द्या, असे आपल्या पित्याला ते म्हणाले तेव्हा विशालदेव म्हणाले पुत्रा ते शत्रूचे राज्य. तेथे तुला काहीही धोका होऊ शकतो, परंतु विशाळ देवाचे म्हणणे टाळून हरिपाळदेवाने रामटेकच्या यात्रेला जाण्याचा निर्धार पक्का केला. यात्रेला जाऊ देत नाही, म्हणून त्यांनी आपल्या आहारातील एक एक पदार्थ वर्ज केला आणि शेवटी केवळ पाणी भात एवढीच आरोगणा भोजन म्हणून स्वीकार करु लागले.तेव्हा त्यांची प्रकृती क्षिण होत चालली,
ते पाहून मालनी देवी मध्यस्थी पडल्या आणि शेठ,सावकाराप्रमाणे हरिपाळालाही रामटेक यात्रेला जाऊ द्यावे,असा आग्रह धरला. त्यानुसार हरिपाळदेव रामटेक यात्रेच्या निमित्ताने गुजरातचे राजवैभव सोडून महाराष्ट्राच्या दिशेने निघाले. बरोबर विशाल देवाने बरेच सेवक सैनिक दिले, परंतु प्रत्येक मुक्कामाहून एक एक सैनिक सेवक परत पाठवला आणि काजळे देऊळवाडा या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या दोन सेवकांनाही झोपेतच सोडून हरिपाळदेव ऋद्धपुर या ठिकाणी श्री गोविंद प्रभुंच्या भेटीसाठी निघाले.
ऋद्धपुर या ठिकाणी रांधवन हाटा मध्ये श्री गोविंद प्रभू एका हलवायाच्या दुकानावर शेंगुळबुडे खात होते, श्री गोविंद प्रभूना हरिपाळदेवाने सविनय प्रणिपात केला. श्री गोविंद प्रभू प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या हातातील शेंगूळबुडे हरीपाल देवाकडे फेकले, हरीपाळ देवाने ते वरचेवर झेलले, व ग्रहण केले. आणि श्रीप्रभू म्हणाले “आवो मेला जायेः चक्रा होय म्हणेः चक्रु होय म्हणेः श्री चक्रधरू होयेची म्हणे ” या अलौकिक लीळेतून हरिपाळ देवाने, श्रीचक्रधर या श्रीप्रभुंनी दिलेल्या प्रसादिक नावाबरोबरच परावर ज्ञान शक्तीचाही स्वीकार केला आणि हरिपाळ देवाचे नाव आता श्री चक्रधर स्वामी असे झाले.
श्री गोविंद प्रभूची प्रेरणा घेऊन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे जीवोद्धारासाठी परिभ्रमणाला निघाले. प्रथम ते सालबर्डी या ठिकाणी आले. भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त वाचकांच्या सेवेत ही सेवा अर्पण करीत आहो.
*न्यायंबासबाबा उपाख्य सैन्गराज शास्त्री महानुभाव* मकरधोकडा जि.नागपूर
(प.पू. न्यायंबासबाबा शास्त्री महानुभाव )