मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान आणि छत्तीसगडमध्ये रमणसिंह मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असताना भाजपने तिथे नेतृत्वबदल केल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे देशाचं लक्ष लागलं होतं. वसुंधराराजे, दिया कुमार यांची नावे सर्वाधिक चर्चेत होती. परंतु भाजपने पुन्हा धक्कातंत्र वापरत अखेर भजनलाल शर्मा यांची राजस्थानचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषणा केलीये. तर उपमुख्यमंत्री म्हणून दिया सिंग आणि प्रेमचंद बैरवा यांची निवड केलीये. त्यामुळे वसुंधराराजे यांचं राजस्थानमधील महत्त्व कमी झालंय का? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राजनाथ सिंह, प्रल्हाद जोशी आणि विनोद तावडे यांचं पर्यवेक्षक मंडळ आज सकाळी जयपूरला रवाना झालं. तिथे त्यांनी नवनिर्वाचित आमदारांशी सविस्तर चर्चा केली. दुपारी ४ वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडल्यानंतर सर्व आमदारांच्या पाठिंब्याने विधिमंडळ नेता म्हणून भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भजनलाल शर्मा सांगानेरचे आमदार असून भाजपचे सरचिटणीस आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत भजनलाल शर्मा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. भाजपच्या तिकिटावर विजयी झालेल्या आमदारांनी त्यांना आपला नेता म्हणून पसंती दिली. निरीक्षकांच्या उपस्थितीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी वरिष्ठ नेत्यांनी निरीक्षकांची भेट घेतली होती.
वसुंधराराजे अखेरपर्यंत मुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्न करत होत्या
राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने ११५ जागा जिंकल्या. बहुमत मिळाल्यानंतर राजस्थानमध्ये पुन्हा वसुंधराराजे मुख्यमंत्री होतील, अशी अटकळ अनेक जण बांधत होते. परंतु मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी धक्कादायक बदल करून राजस्थानमध्ये काय होईल, याचे संकेत केंद्रीय नेतृत्वाने दिले होते. तरीही वसुंधराराजे अखेरपर्यंत मुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्न करत होत्या. त्यांनी राजनाथ सिंह यांच्याशी दीर्घ चर्चा केली.
दिया कुमारी यांनीही मुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्न केले
वसुंधराराजे यांच्या खालोखाल दिया कुमारी यांचं नाव सर्वाधिक चर्चेत होतं. त्या देखील मुख्यमंत्रिपदासाठी अखेपर्यंत प्रयत्न करत होत्या. जर वसुंधराराजेंना मुख्यमंत्रिपद नाकारलं तर दिया कुमारी यांच्या नावाला केंद्रीय नेतृत्व ग्रीन सिग्नल देऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यांनी देखील आज राजनाथ सिंह, विनोद तावडे यांच्याशी चर्चा केली.