उधारीचे पैसे मागितल्याने २३ वर्षीय पानठेलाचालकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
उधारीचे पैसे मागितल्याने युवकाने पानठेलाचालकाचा खून केला. ही घटना सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावरमेंढा येथे घडली. अंकित मनोज शाहू (वय २३) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी सागर रामचंद्र खानकुरे (वय ३०) याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकितचे वडील मनोज हे शेती करतात. त्याचा मोठा भाऊ सूरज हा खासगी प्रतिष्ठानात कामाला आहे. अंकितचा घरासमोरच पानठेला असून, सागर हा त्याच्याकडून उधार खर्रा घेतो. त्याची उधारी साडेतीन हजार रुपये झाली. अंकित हा सागरला पैसे मागयचा. सागर टाळाटाळ करायचा. बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास सागर पानठेल्यावर आला. अंकितने त्याला उधारीचे पैसे मागितले. तसेच सागरच्या मोटारसायकलची चावी घेतली. ‘पैसे दिल्याशिवाय चावी देणार नाही’, असे अंकित त्याला म्हणाला.
‘माझ्या नादी लागू नको, नाहीतर बरे होणार नाही’, अशी धमकी सागरने अंकितला दिली. याचवेळी अंकितची आई तेथे आली. तिने अंकितला चावी परत करण्यास सांगितले. अंकितने सागरला चावी परत केली. धमकी देऊन सागर तेथून परत गेला. रात्री ९ वाजताच्या सुमारास सागर पुन्हा पानठेल्याजवळ आला. अंकितला पानठेल्याबाहेर बोलाविले. दगडाने डोके ठेचून त्याचा खून केला व पसार झाला. दरम्यान, अंकित घरी आला नाही म्हणून त्याची आई पानठेल्याजवळ गेली. यावेळी सागर हा अंकितवर दगडाने वार करताना अंकितच्या आईला दिसला. तिने आरडाओरड केली. सागर हा मोटारसायकल घेऊन पसार झाला. शेजाऱ्यांनी अंकितला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे