भारताच्या इतिहासात ज्या राजांनी गोरगरीब,मागासवर्गीय,उपेक्षित घटकांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिलं,त्यात छ्त्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे नाव अग्रभागी घेतले जाते.शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या घाडगे घराण्यात झाला,अन् जणू बहुजनांचा कैवारी उदयास आला.शाहूंच्या वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब तर,आईचे नाव राधाबाईसाहेब. मागासवर्गीयांचे जीवनमान सुधारून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात सरकारी नोकऱ्यांमध्ये *आरक्षण कायदा* लागू करून ५० टक्के नोकऱ्या बहुजन समाजासाठी राखीव केल्या. शाहू महाराजांनी २ एप्रिल १८९४ मध्ये कोल्हापूर संस्थानाचे अधिपती झाले.त्यांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला.इतकेच नव्हे तर,सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने त्यांनी अस्पृश्यता निवारण,जातीभेद निर्मूलन,बलुतेदार पद्धतीवर बंदी,स्त्री शिक्षण,महिला संरक्षण कायदा,महारवतन खालसा,देवदासी प्रथेचे उच्चाटन,पुरोहित पद्धती,सरकारी दप्तरावर वंशपरंपरागत असलेली कुलकर्णी नेमणूक पद्धती रद्द केली,भिक्षुकशाही प्रथा बंद केली तसेच विधवा पुनर्विवाह अन् आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन असे लोकोपयोगी निर्णय अमलात आणले.महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीला संजीवनी देऊन त्यात त्यांनी
नवचैतन्य निर्माण केलं. सामाजिक न्याय प्रस्थापित करणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांना जयंती दिनानिमित्त मराठी जनमानसाची भावपूर्ण आदरांजली अन् त्रिवार मानाचा मुजरा!
समाजातील मागासवर्गीय जाती-जमातीच्या लोकांना शिक्षणाची कवाडं खुली केल्याशिवाय त्यांचा बौद्धिक,सामाजिक व आर्थिक विकास होणार नाही,हे जाणून शाहू महाराजांनी *प्राथमिक शिक्षण सक्तीचं* करून त्यावरील शैक्षणिक शुल्क माफ केलं.तसेच आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविणाऱ्या पालकांना प्रतिमाह एक रुपया दंड लावण्याची कायदेशीर तरतूद केली.सुमारे ५०० अन् त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या खेड्यांमध्ये त्यांनी प्राथमिक शाळा उघडल्या.विविध शिष्यवृत्त्या देऊन बहुजन समाजाला शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आजीवन प्रयत्न केले.प्रौढ स्त्रियांना शिक्षणासाठी प्रवृत्त करणाऱ्या शिक्षिकांना महाराजांकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असे.विभिन्न जातीधर्मांतल्या विद्यार्थ्यांसाठी शाहूंनी आपल्या संस्थानात वसतिगृहे काढली.त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या संस्थानात सर्वधर्मसमभाव प्रस्थापित केला.सन १९०१ मध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी *व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस* उघडले. शिक्षणाशिवाय विकास नाही,या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवली,याला इतिहास साक्षीदार आहे.
आपल्या संस्थानातील निर्धन,दुर्लक्षित घटकांचे दुःख,यातना,व्यथा,निरक्षरता ह्या गोष्टींचे मुळ म्हणजे शिक्षणाचा अभाव असल्याने शाहू महाराजांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल अन् मागास घटकांना शिक्षणाचा मार्ग दाखविला.
शिक्षणाशिवाय दुसरा तरणोपाय नाही,हे त्यांच्या मनावर बिंबविले .त्याची परिणिती म्हणजे आज मागासवर्गीय अन् आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे सदस्य शिकूनसवरून विविध क्षेत्रात प्रगतीच्या मार्गाने आगेकूच करताना दिसत आहेत.वास्तवात ही शाहू महाराजांचीच पुण्याई म्हणावी.त्यानंतर फुले दाम्पत्य अन् घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही हाच धागा धरून पुढील काळात वाटचाल केली.बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोफत सोय व्हावी,या उद्देशाने त्यांनी १९०७ मध्ये *मिस क्लार्क बोर्डिंग* नावाचे वसतिगृह उभारले.स्पृश्य-अस्पृश्य सदस्यांची सामूहिक भोजने,अस्पृश्यता निर्मूलन परिषदा आयोजित करून त्यांची अस्मिता जपली.शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातील सर्वधर्मियांसाठी शिक्षणाची केली.यामुळेच त्यांना *शिक्षणमहर्षी* म्हणणे संयुक्तिक ठरेल.
महाराष्ट्र शासनाने शाहू महाराजांच्या धोरणाचा अंगिकार करून मागास जनजातीच्या मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत केलं आहे.मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनातर्फे *राजर्षी शाहू गुणवत्ता शिष्यवृत्ती* देण्यात येत आहे.तसेच १० वी अन् १२ वीच्या परीक्षेत प्रथम येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता *राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार*
,*योजना* कार्यान्वित केली आहे.अशा तत्सम अन्य योजनाही शैक्षणिक कारणांसाठी मागास समाजाच्या मुला-मुलींकरिता राज्य सरकारने सुरू केल्या आहेत.राज्य सरकार हे शाहू महाराजांचे पाईक असून, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते आहे.राजर्षी शाहू महाराज हे आमचे आदर्श असून,त्यांनी प्रज्वलित केलेली सामाजिक समतेची मशाल आम्ही अखंड तेवत ठेऊ.अत: शाहू महाराजांना आम्ही मराठीजन त्रिवार मानाचा मुजरा करतो.
“आपण केवळ शेतकरी वा सैनिक होऊन चालणार नाही.तर व्यापार-उद्योगात शिरून उद्यमशील होणं देखील तितकेच गरजेचं आहे.आज हे धाडस जर आपण केलं नाही,तर आपल्या सर्व चळवळी वाया जातील”,असा मोलाचा सल्ला शाहू महाराजांनी युवकांना दिला.शाहू महाराजांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ शिरोळ येथे *जयसिंगपूर बाजारपेठ* स्थापन केली.त्याबरोबरच तेल व औषधी उद्योग,वस्त्रोद्योग अशा अनेक लघु उद्योगांना चालना दिली. सन १९०६ मध्ये शाहू महाराजांनी स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना केली.कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी *राजाराम इंडस्ट्रियल स्कुल* ची निर्मिती केली.आपण स्वतः उद्यमशील व्हावे,यासाठी महाराजांनी आपल्या दोन्ही सुपुत्रांना उद्यमशील केलं.अशाप्रकारे कोल्हापूर संस्थानात उद्योगाचं जाळं निर्माण करून लाखो लोकांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न सोडविला.त्यामुळेच आजही शाहूंची *दूरदृष्टीचा राजा* म्हणून ख्याती आहे.
*कृषी विकास* साधण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी,यासाठी ते आग्रही असत.शेतकऱ्यांना यासंदर्भात मार्गदर्शन व्हावे,या उद्देशाने १९१२ मध्ये त्यांनी कोल्हापूर येथे किंग एडवर्ड एग्रिक्लचर इन्स्टिट्युटची उभारणी केली. इतकेच नव्हे तर,शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या अवजारांचे त्यांनी म्युझियम सुरू केले होते.याशिवाय शेतीच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी आपल्या संस्थानात कृषी अधिकाऱ्यांची नेमणूक केली. उल्लेखनीय बाब म्हणजे शाहू महाराजांनी शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधून आपले क्षेत्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी *राधानगरी धरण* ची उभारणी केली.त्यांच्या संकल्पनेतून साकारलेले *कोल्हापूर टाईप बंधारे* हे आज महाराष्ट्रात सर्वत्र रोल मॉडेल ठरले आहेत.शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने *शेतकऱ्याचे कैवारी* होते,हे सिद्धीस येते.
शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात संगीत,नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कलावंतांना राजाश्रय दिला. गानमहर्षी अल्लादिया खाँ,भास्करबुवा बखले,केसरबाई केरकर, मोनुबाई कुर्डिकर, शालिग्राम,गोविंदबुवा,निवृत्ती बुवा सरनाईक आदी कलावंत कोल्हापूर नगरीत
नावरूपाला आलेत.त्याचप्रमाणे शाहीर विठ्ठल ढोणे,रामचंद्र माळी,लहरी हैदर हे नामवंत शाहीर तसेच बालगंधर्व, शंकरराव सरनाईक,हिराबाई बडोदेकर अशा नाटककारांची येथे जडणघडण झाली.वास्तवात शाहू महाराज हे कलावंतांचे आधारवड होते.
इतकेच नव्हे तर,शाहू महाराजांनी कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृह उभारून नाट्यरसिकांच्या मनोरंजनाची मोठी सोय केली.शाकुंतल,मृछकटिक,मानापमान ही नावाजलेली नाटके आणि पुंडलिक,राजा हरिश्चंद्र हे चित्रपट तर कलामहर्षी दादासाहेब फाळके,दादासाहेब तोरणे, बाबुराव पेंटरसारख्या ज्येष्ठश्रेष्ठ कलावंतांना मानाचं पान देऊन त्यांना किर्तीमान केलं.त्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांना प्रोत्साहित करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.ह्या सर्व गोष्टी पाहिल्यावर शाहू महाराज हे कलावंतांचे आश्रयदाते होते,हे प्रकर्षाने दृष्टोत्पत्तीस येते.
*सामाजिक न्याय* या धोरणाचा राज्य सरकारने काटेकोरपणे अवलंब करून राज्यातील गोरगरीब,गरजू मागासवर्गीयांचा सर्वांगीण विकास साधावा,म्हणजे हीच खरी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली ठरेल.जय महाराष्ट्र!
*लेखक – रणवीर राजपूत*