छत्रपती संभाजीनगर, 25 जून (हिं.स.) : शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनाचे प्रमाण वाढविण्याच्या प्रयत्नात जमिनीचा पोत बिघडून भविष्यात जमिनीच्या उत्पादकतेत घट होतो, जल, मृद संधारण उपाययोजनांच्या अभावी माती वाहून जाण्याचे प्रमाण वाढते, ह्यामुळे शेतीचा ऱ्हास होऊन नुकसान होते, हे टाळण्यासाठी सर्वंकष कृषी विकासाच्या उपाययोजनांवर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, आत्मा नियामक मंडळ, प्रधानमंत्री पीक विमा योजना, गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प इ. योजना व कार्यक्रमांबाबत आढावा घेण्यात आला.
माहिती सादर करण्यात आली की, यंदा जिल्ह्यात ६ कोटी ३१ लक्ष ५७४ घ.मी. गाळ काढण्यात आला व तो ६०० हेक्टर क्षेत्रावर पसरवण्यात आला. जिल्ह्यात धरणातील गाळ हा शेतात टाकल्यामुळे शेतीच्या वाढलेल्या उत्पादकतेबाबत मोजमाप करुन त्याचे दस्तऐवजीकरण करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
जिल्ह्यात आत्मा प्रकल्पाअंतर्गत उद्योग क्षेत्राच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून १ लाख ४१ हजार ११२ रुपयांचे एक असे ५०० मशरुम उत्पादक केंद्र सुरु करावयाचे आहेत. त्याबाबत चर्चा करण्यात आली. शिवाय कृषी विस्तार सुधारणा, परंपरागत कृषी विकास योजना , सेंद्रीय शेती, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन , प्रधानमंत्री पीक विमा योजना याबाबत आढावा घेण्यात आला. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजने अंतर्गत जिल्हातील १५४१ प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यात ४०६ गावांचा समावेश असून आतापर्यंत या प्रकल्पअंतर्गत १ लाख ४ हजार ५३ लाभार्थ्यांना ९९४ कोटी ५० लक्ष रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. तसेच १८९८ शेतकरी गटांना १८९ कोटी ४५ लाख ५२६ रुपयांचा लाभ देण्यात आला आहे,अशी माहिती देण्यात आली.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, शेतीचा पर्यावरणीय ऱ्हास थांबविण्यासाठी जलमृदा संधारणावर भर द्यावा. माती वाहून जाणे थांबवा. वृक्ष लागवडीवर भर द्यावा. नैसर्गिक पद्धतीने शेती करण्यास चालना द्यावी. तसेच शेतीला पूरक असणारे रेशीम उद्योग, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, प्रक्रिया उद्योग अशा सर्व घटकांचा विकास करुन शेती विकासाला चालना द्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले