नवी मुंबई, 25 जून (हिं.स.) : नवी मुंबईतील स्वच्छताकार्यात तरूणाई स्वयंस्फुर्तीने सहभागी होताना दिसत असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नागरिकांना केलेल्या आवाहनानुसार लोकसहभागाची व्यापकता वाढलेली आहे.
या अनुषंगाने विविध विभागांमध्ये नागरिकांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छता मोहीमा राबविण्यात येत असून अशाच प्रकारची विशेष स्वच्छता मोहीम आज अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार तसेच उपआयुक्त डॉ. अजय गडदे व डॉ. कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली, घणसोली विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त संजय तायडे यांच्या नेतृत्वाखाली पाम बिच लगत खाडी किनारा परिसरात राबविण्यात आली.
यामध्ये स्थानिक नागरिकांप्रमाणेच तेजस्व करिअर अकॅडमीच्या 70 विद्यार्थी युवक – युवतींनी उत्स्फुर्त सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, कागद आणि तत्सम स्वरूपाचा कचरा गोळा केला. यामध्ये घणसोली विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक व स्वच्छताकर्मी उत्साहाने सहभागी झाले होते.