लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना भाजपा नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांची गृहमंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे.
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पाठवलेल्या तक्रारीत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणतात की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाटी आयोजित एका बैठकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राम सातपुते यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन एका समाजाच्या काही व्यक्तींवर कोविड काळात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ते गुन्हे मागे घेऊ, चिंता करण्याचे काही कारण नाही असे त्या बैठकीत उपस्थितांना आश्वासित केले. निवडणुकीच्या काळात अशा पद्धीतने प्रलोभन देणे, आश्वासन देणे हा आचारसंहितेचा भंग आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार राज्य सरकारच्या समितीने शिफारस केल्याशिवाय हे गुन्हे मागणे घेता येत नाहीत. तरीही मतदारांना प्रलोभन देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन देऊन मतदारांची दिशाभूल केलेली आहे.
हे पण वाचा : मोची समाज झाला राम सातपुते यांच्या विरोधात आक्रमक
आतापर्यंत या समाजातील व्यक्तींवरील गुन्हे का मागे घेतले नाहीत? आता निवडणुकीच्या दरम्यान या गुन्ह्यांची आठवण कशी झाली? फडणवीस गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन देण्यासाठी निवडणुकीची वाट पहात होते का? असे प्रश्न उपस्थित करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर केल्याचे स्पष्ट दिसत आहे, फडणवीस यांना गृहमंत्री पदावरून तात्काळ दूर करावे तसेच सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुते यांची उमेदवारी रद्द करा, अशी तक्रार काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे, असे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.