महंमद इब्न बख्तियार खिल्जी या नराधमाने हिंदुस्थानातील अनेक विद्याकेंद्र, मंदिरे, मठ, वेदविद्यालये, विद्यापीठे शोधून काढली आणि ती बेचिराख करण्याचा सपाटा लावला. कोणी काहीही म्हणोत पण नालंदाचे जगप्रसिद्ध विश्वविद्यालय याच बख्तियार खिल्जीने जाळून टाकले. या नराधमाने आपली विश्वविद्यालये आणि मंदिरे, मठ नष्ट केली आणि त्याच्या नावाने आज बिहारमध्ये पाटणा जिल्ह्यात एक छोटे शहर आहे. त्या शहराचे नाव बख्तियारपूर आहे. हे शहर बिहारच्या मध्यभागात पाटण्याच्या चाळीस किलोमीटर पूर्वेला वसलेले असून ते एक रेल्वे स्थानकही आहे.
आपल्या बांधवांच्या रक्ताने ज्याचे हात माखलेले आहेत आणि ज्याने इथली शारदेची मंदिरे, विद्येची मंदिरे नष्ट केली त्या नराधमाचे नाव आपण आपल्या देशातील शहरांना देऊन त्यांच्या विषयीचा आदरभाव व्यक्त करतो आहोत, याची लाज वाटते. कारण यात गुलामगिरी मानसिकता विशेषत्वाने आढळते.
बख्तियार खिल्जी भारतात राहून लूटमार करणाऱ्या एका इस्लामिक टोळीचा सभासद होता. तो जेव्हा बदायून नावाच्या नगरीत पोहचला तेव्हा तेथे हिज्बारउद्दीन हसन नावाचा एक मुसलमान दरोडेखोर होता. त्याने तिथे स्वतःचे बस्तान बसवले होते. त्याला त्याच्या टोळीत उडाणटप्पू आणि क्रूर असा एक नराधम हवा होता. असा नराधम त्याला बख्तियारच्या रूपात मिळाला.
अत्यंत अल्पकाळात खिल्जीने सहमत आणि सहली नावाच्या दोन गावांवर दहशत निर्माण करून ती स्वतःच्या कह्यात घेतली आणि तिथे स्वतःची जहागिरी म्हणून घोषित केली. दरोडेखोरी आणि अत्याचार या कुकर्मात त्याने स्वतःचे कौशल्य वाढवले होते.
ब्राह्मणांनी नालंदा जाळले: एक काल्पनिक कथा
खिल्जीच्या सुमारे चारशे वर्षानंतर तारानाथ नावाचा एक लामा होऊन गेला. त्याने हिस्टरी ऑफ बुद्धिझम इन इंडिया या नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्याने एक कथा लिहिली त्या कथेनुसार नालेंद्र नावाच्या एका राजाने मंदिर बांधले. ते तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जात होते. या तीर्थक्षेत्री दोन भिकारी यात्रेकरूच्या वेशात भीक मागण्यासाठी आले. त्यांची बौद्ध भिक्षुकांशी काही वादावादी झाली. बौद्ध भिक्षुकांकडून त्यांचा अपमानही झाला. पण त्या दोन भिकाऱ्यांपैकी एक भिकारी भिक्षा मागण्यासाठी तिथून दुसरीकडे निघून गेला. दुसरा यात्रेकरू मात्र अपमानाचा प्रतिशोध घेण्यासाठी तिथेच राहिला. त्याने त्या एका भागात जमीन खणून एक खड्डा केला. त्या खड्ड्यात बसून त्याने नऊ वर्षे सूर्यसाधना केली. पण या नऊ वर्षांच्या साधनेने त्याला अपेक्षित असलेली सिद्धी प्राप्त झाले नाही. म्हणून तो त्या खड्ड्यातून बाहेर आला. तो बाहेर येताच एकाने त्याला अडवले आणि सांगितले जोपर्यंत तू सिद्धी प्राप्त करत नाहीस तोपर्यंत त्या खड्ड्यातच राहा आणि साधना कर. सिद्धी प्राप्त न करताच खड्ड्यातून बाहेर आला तर मी तुझा शिरच्छेद करीन. या धमकीला बळी पडून तो यात्रेकरू खड्ड्यात बसून पुन्हा सूर्य साधना करू लागला सुमारे तीन ते चार वर्षानंतर तो त्या खड्ड्यातून बाहेर आला तेव्हा त्याला सिद्धी प्राप्त झाली होती. सूर्य साधनेमुळे त्याच्यात तेज निर्माण झाले त्या तेजामुळे नालंदा विद्यापीठ जळून गेले. अशा प्रकारे त्या ब्राह्मणानेच नालंदा विद्यापीठ जाळले त्यात ८४ मंदिरे भस्मसात झाली.
या काल्पनिक कथेचा आधार घेऊन नालंदा ब्राह्मणांनी जाळली अशी आरडा ओरड सध्या चालू आहे.
नालंदा जाळणारा खिल्जी : ऐतिहासिक दाखले
वरील कथा ही पूर्णपणे काल्पनिक आहे हे सिद्ध करणारे अनेक ग्रंथ आज उपलब्ध आहेत.
खिलजीच्या समकालीन असणारा मौलाना मिन्हाजउद्दीन याची बखर तबकात-इ-नासरी आपल्याला सांगते की खिल्जीने नालंदा विद्यापीठ जाळले. तो २०० घोडेस्वारांना घेऊन आला होता. त्याने नालंदावर आक्रमण केले. तिथल्या स्थानिक ब्राह्मणांचा शिरच्छेद केला.
खिल्जीच्या वाढत्या दराऱ्याची अधिकाराची आणि कसबाची वार्ता दिल्लीत अधिकार गाजवणाऱ्या कुतुबुद्दीन ऐबक यांच्या कानावर पोहोचली. स्वतःच्या इस्लामी हैदोसाने हिंदुत्वाचा विध्वंस करू शकणारा एक नवीन मुसलमान गुंड तयार झाल्याचे ऐकून कुटुबुद्दीन ऐबकला त्याचा अभिमान वाटला. त्याच्या या कुकृत्याबद्दल कुतुबुद्धीने खिल्जीला मानाचा पोशाख, दागिने रोख रक्कम देऊन गौरवले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र वाङ्मय उपलब्ध आहे. या वाङ्मयातील सातव्या खंडात नालंदा विद्यापीठ संबंधी जी माहिती मिळते ती अशी..
“मुसलमान आक्रमकांनी ज्या विश्वविद्यालयांची लूट केली त्या पैकी नालंदा, विक्रमशीला, जगदल औदंतपुरी इथल्या विश्वविद्यालयांचा समावेश होतो. त्यांनी बौद्ध मठांचा विध्वंस केला. तिथले सहस्रावधी भिक्षुक घाबरून पळून गेले आणि त्यांनी नेपाळ,तिबेट इथे वास्तव्य केले. मुसलमानांनी सहस्रावधी भिक्षूंची हत्या केली.”
फ्रेडरिक एम आशेर, जे एन यु चे प्राध्यापक वीरेंद्रनाथ प्रसाद, अमेरिकन इतिहासकार आणि तत्वज्ञानी विल डुरंट, अमर्त्य सेन, अरुण शौरी, पु.ना.ओक या आणि अशा अनेक लेखकांनी नालंदा विश्वविद्यालय बख्तियार खिल्जीने जाळल्याचे त्यांच्या ग्रंथातून साधार सिद्ध केले आहे.
खिल्जीच्या वाढत्या उन्मादाला रोखण्यासाठी पुढे सरसावला तो आसामचा हिंदूराया. त्याने खिल्जीचे कंबरडे मोडले. पण खिल्जी त्याच्या तावडीतून सुटला. अखेरीस त्याला त्याच्याच सैनिकाने भोसकून ठार मारले. अनेकांचा कर्दनकाळ ठरलेला हा नराधम गझनीपासून लांब दुसऱ्या टोकाला असलेल्या देवकोट येथे मारला गेला.
या इतिहासाकडे डोळे झाक करून जाणीवपूर्वक हिंदूंमध्ये जातीय तणाव निर्माण करण्याच्या हेतूने नालंदा विद्यापीठ खिल्जीने जाळले नसून ब्राह्मणांनी जाळले असा अपप्रचार केला जातो.
यामागे देशात आराजक निर्माण व्हावे हाच हेतू आहे. असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे. इतिहासाचे विकृतीकरण करून देशात यादवी वाजवण्याचा प्रयत्न करणे हा राष्ट्रद्रोह आता सहन करणे म्हणजे आपणच आपला घात करण्यासारखा आहे. याला पाय बंद घालण्यातच राष्ट्राचे हित आहे.
– दुर्गेश जयवंत परुळकर