मुंबई, १ जुलै, (हिं.स) गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट सांगणारा ”धर्मवीर -2” या सिनेमाचा पोस्टर लाँच सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडला. सुप्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल, सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. येत्या ९ ऑगस्ट रोजी, ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे.
“धर्मवीर – २” या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई,उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. कथा,पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रवीण विठ्ठल तरडे यांनीच निभावली असून महेश लिमये यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे. नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले होते.
”धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे” या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता. अभिनेता प्रसाद ओक याने स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची भूमिका साकारली होती. सिनेमाच्या या भागात देखील प्रसाद ओक दिघे साहेबांचा भूमिकेत दिसणार असून, अभिनेता क्षितिज दाते हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना, स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्याचा प्रयत्न धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमातून करण्यात आला होता. आता धर्मवीर -2 या सिनेमाद्वारे साहेबांचे हिंदुत्व आणि सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी केलेला संघर्ष लोकांसमोर येणार आहे. तसेच त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना मी केलेला संघर्ष आणि माझी वाटचाल देखील या सिनेमातून पहायला मिळेल असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
या सिनेमाला शुभेच्छा देताना ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ, ज्येष्ठ दिग्दर्शक सचिन पिळगावकर आणि निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. तसेच धर्मवीरचा पहिला भाग संपतानाच या सिनेमाचा दुसरा भागही येणार याची प्रेक्षकांना कल्पना होती. या सिनेमाद्वारे स्वर्गीय आनंद दिघे यांची पुढची गोष्ट प्रेक्षकांना पहायला मिळेल. तसेच क्षितिज दाते याच्या रूपाने मुख्यमंत्री होण्याआधीचे एकनाथ शिंदे पहायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तर बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यांनी या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचे स्वागत करून पहिल्या भागाप्रमाणे दुसरा भागही प्रेक्षकांना नक्की आवडेल आशा शुभेच्छा दिल्या.
“धर्मवीर – २” चित्रपटाच्या पोस्टरवर करारी नजर असलेले दिघे साहेब झोपाळ्यावर बसलेले दिसतायत.”हिंदुत्त्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही” अशी ओळही पोस्टरवर नमूद करण्यात आली आहे