सोलापूर : सोलापुरातील जनतेने भरघोस मताने भाजपाला सत्ता मिळवून दिली विरोधी पक्ष नेत्यासह चांगला अनुभव असलेले नरेंद्र काळे यांच्याकडे पक्षाने सभागृह नेते पदाची
जबाबदारी दिली आहे. सोलापूरच्या विकासासाठी आणि अनेक प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून नरेंद्र काळे हे सभागृह चांगल्या पद्धतीने चालवतील, असा विश्वास महापौर विनायक कोंड्याल यांनी व्यक्त केला.
सोलापूर महानगरपालिकेतील सत्ताधारी गटाच्या सभागृह नेतेपदाचा पदभार नगरसेवक नरेंद्र काळे यांनी आज पंडित दीनदयाळ उपाध्याय सभागृहात
स्वीकारला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याला महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, सरचिटणीस नगरसेवक प्रा. डॉ. नारायण बनसोडे , माजी महापौर श्रीकांचना यन्नम , रंजीता चाकोते यांची प्रमुख उपस्थिती होती.
पदभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र काळे यांनी सभागृहातील कामकाज अधिक प्रभावी, शिस्तबद्ध आणि जनहिताभिमुख ठेवण्याचा संकल्प व्यक्त करत सभा शास्त्राचे धडे दिले. शहराच्या विकासाला गती देणे, नागरिकांचे प्रश्न ठामपणे मांडणे आणि प्रशासनाशी समन्वय साधून विकासकामे मार्गी लावणे यास प्राधान्य राहील. सर्वांची साथ महत्त्वाची ठरणार आहे. महापालिका सभागृहात पक्षाची मते तयार होतात. सभागृहातील भूमिकेवरच जनमत तयार होते. सभागृहात आपण सर्व सदस्यांनी चांगले वागले पाहिजे.मोठ्या जागा जिंकून दिल्या आहेत. यामुळे काम करणे गरजेचे आहे. लोकांच्या अनेक अपेक्षा आहेत, त्या पूर्ण केल्या पाहिजेत. पक्षामुळे आपण आहोत याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे, असे नरेंद्र काळे म्हणाले.
भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनीही संघटनात्मक ताकदीच्या जोरावर शहर विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. भाजपाने 87 जागा जिंकून एक वेगळा विक्रम केला आहे. यामुळे सगळ्यांवर शहर विकासाची मोठी जबाबदारी आहे. भाजपाला मत विकासाला मत अशी घोषणा घेऊन आपण निवडणूक जिंकलो आहोत. न भूतो न भविष्यती असे यश मिळाले आहे. यामुळे सोलापूर शहरवासीयांना सोयी सुविधा देतानाच वैशिष्ट्यपूर्ण कामे करायचे आहेत. महिला नगरसेवकांनी घराप्रमाणे शहराचा कारभार पाहायचा आहे. हद्दवाढ भागातील नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे करावी लागणार आहेत. सभागृह नेते पदाची काळे यांच्यावर मोठी जबाबदारी आहेत ते सर्वांना घेऊन निश्चितच ते चांगल्या पद्धतीने पार पाडतील. सर्वच नगरसेवकांनी सभागृह नेत्यांना भेटून आपापल्या समस्या प्रश्न, मांडावेत. ते सर्वांना मार्गदर्शन करतील. सर्वांना निश्चितच ते न्याय देतील, असा विश्वास शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी व्यक्त केला.
पहिल्या सभेत वातावरण बरोबर नव्हते : नरेंद्र काळे
पहिल्याच विशेष सभेत सभागृहात वातावरण बरोबर नव्हते. कुणीही उठून बोलत होते. योग्य शिस्त पाळणे गरजेचे आहे. कोणतीही चूक होऊ नये. परवानगी घेऊनच बोलावे. सदस्यांचे वर्तन चांगले हवे. वर्तन चुकले तर ते पक्षावर येते. चुकांमुळे पक्षाचे नुकसान होऊ नये. यामुळे पक्षाची प्रतिमा उंचावणे. ती टिकवणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे आवाहन नूतन सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी केले.
























