पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी कथित 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना एकवर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात जावे लागले. तसेच अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने कठोर कारवाई केली होती. काही महिन्यांपूर्वी अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला. यावर अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( यांचे नाव घेत मोठा गौप्यस्फोट केला. आपल्याला कोणत्या परिस्थितीत जावं लागलं, तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याशी समझौता करण्यासाठी माणूस पाठवला होता, असा मोठा असे त्यांनी म्हटले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते सर्व कल्पित गोष्टी बोलत आहेत. बरंच सत्य हे माझ्याजवळ आहे. योग्य वेळी मी ते बाहेर काढेल. आज त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने सणसणी पसरवायची आहे. मात्र ज्यावेळेस मी सत्य बाहेर काढेल त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे याच्यावर जास्त काही मी बोलत नाही.
काळजी करू नका, योग्यवेळी मी सत्य बाहेर काढेलच
खरं म्हणजे या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे. त्या घटनेमध्ये हे सरकारमध्ये होते. त्यांचं सरकार त्या ठिकाणी होतं. त्यांच्याच काळात सगळा तो फॉर्मचा आणि शंभर कोटीचा घोटाळा झाला. त्यानंतर त्यांनी मला काय निरोप पाठवले? या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. काळजी करू नका, योग्यवेळी मी सत्य बाहेर काढेलच, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
ठाकरेंना मानसोपचार तज्ञाची आवश्यकता
शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी काल सुद्धा बोललो की मोदीजी बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करू शकत नाही. त्यांनी वारंवार सांगितलं की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे आमच्याकरता त्या ठिकाणी आदर्शच आहेत. पण आत्ताची स्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंचा तोल गेला आहे. त्यांच्यावर मानसिक परिणाम झालेला आहे. त्यांना मानसोपचार तज्ञाची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की तात्काळ त्यांना मानसोपचार तज्ञांकडे नेलं पाहिजे, असे टीका त्यांनी यावेळी केली.
भुजबळ साहेब कधीच दुसऱ्या कोणाचा प्रचार करणार नाहीत
आमदार सुहास कांदे यांनी मंत्री छगन भुजबळ हे तुतारीचा प्रचार करत असल्याचा गंभीर आरोप केला. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भुजबळ साहेब कधीच दुसऱ्या कोणाचा प्रचार करणार नाहीत. भुजबळ साहेब पूर्ण ताकदीने आणि शक्तीने महायुतीच्या पाठीशी आहेत. ते महायुतीचाच प्रचार करतील अर्थात भुजबळ साहेबांमध्ये आणि सुहास कांदे यांच्यात काही डिफरन्स आहेत ते आम्ही दूर करू, असं त्यांनी म्हटलंय.