डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पुणे सीबीआय विशेष कोर्टाने पाच आरोपींपैकी तीन आरोपींची निर्दोष सुटका केली. शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना कोर्टाने दोषी ठरवले. सीबीआय कोर्टाने डॉ. वीरेंद्र तावडे, अॅड. संजीव पु्न्हाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष सुटका केली. या निकालावरून अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तब्बल 11 वर्षानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील निकाल आज जाहीर झाला आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला. तब्बल 11 वर्षांनी प्रकरणाचा निकाल जाहीर होत असल्याने राज्यासह देशाचेही लक्ष लागले होते. सीबीआय कोर्टाने या प्रकरणी डॉ. वीरेंद्र तावडे, अॅड. संजीव पुन्हाळेकर आणि विक्रम भावे यांना पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आले. या प्रकरणातील आरोपी वीरेंद्रसिंह तावडेवर कट रचल्याचा आरोप होता, परंतु सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच, पुनाळेकर आणि भावे विरोधातही आरोप सिद्ध होत नसल्याचे कोर्टाने निकाल वाचनात म्हटले. तर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध झाले. त्यामुळे दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आरोपींचे वकील अॅड. प्रकाश साळशिंगीकर यांनी काय म्हटले?
पाच आरोपींनी खटल्याला सामोरे जावे लागले. त्यापैकी वीरेंद्र तावडे, संजीव पुन्हाळेकर, विक्रम भावे यांची निर्दोष सुटका करण्यात आली.दोन आरोपी दोषी ठरवण्यात आले.
या सगळ्या प्रकरणात पुणे पोलीस, पुणे पोलीस गुन्हे शाखा, सीबीआय यांची वेगवेगळी थेरी होती. अंधश्रद्धेविरोधात लढणाऱ्या डॉ. दाभोलकरांच्या प्रकरणात प्लँट चॅटचा वापर करण्यात आला. या प्रकरणात नागोरी खंडेलवाल,सारंग अकोलकर असे वेगवेगळे आरोपी दाखवण्यात आले. त्यानंतर आता दोन शूटर्स शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना दाखवण्यात आले.
यूएपीए अंतर्गत कोणताही खटला या बसत नाही असे कोर्टाने म्हटले. यूएपीए अंतर्गत दाखल गुन्ह्यातून मुक्तता करण्यात आली. खटल्यात 72 साक्षीदार होते, पण त्यातील अनेक साक्षीदारांना कोर्टात हजर करण्यात आले नाही. कोणत्याही आरोपीचे, साक्षीदार हा ओकारेंश्वर पुलावर गुन्ह्याच्या ठिकाणी हजर होता, याचा डेटा दाखवण्यात आला नसल्याकडे अॅड. साळशिंगीकर यांनी लक्ष वेधले.
सविस्तर निकालपत्र हाती आल्यानंतर आम्ही कोर्टात आव्हान देणार असल्याचेही अॅड. साळशिंगीकर यांनी सांगितले. नागौरी आणि खंडेलवाल यांच्याकडे मिळालेल्या पिस्तुलचे आणि डॉ. दाभोलकर यांच्या शरीरात मिळालेले बुलेट यांचे फॉरेन्सिक रिपोर्ट जुळले होते. त्याचे पुढे काय झाले? याकडे त्यांनी लक्ष वेधले.गुन्हा घडल्यानंतर तातडीने तपास सुरू करून पुरावे जमा करण्याची जबाबदारी पोलिसांची असते. गुन्हा घडल्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा अथवा होण्याचा धोका असतो. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
कर्नाटक एसआयटीमुळे तपासाला वेग…
कर्नाटक एसआयटीकडून एम. एन. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास कर्नाटक एआयटीकडून सुरू होता. त्या तपासाच्या दरम्यान कर्नाटक एसआयटीच्या निदर्शनास आलं की, हे हत्याकांड करणारा गट एकच आहे. त्यामुळे कर्नाटक एसआयटीच्या तपासामधून उलघडा झाला की दाभोळकरांची हत्या ही शरद कळस्कर आणि सचिन अंधुरे या दोघांनी केली आहे. पण हा सगळा उलघडा होण्यासाठी 2018 उजाडले. त्यामुळे सुरुवातीची पाच वर्ष हा तपास चुकीच्या दिशेने होत असल्याने या प्रकरणाचा खटलाच उभा राहिला नाही.
कर्नाटक एसआयटीने दिलेल्या माहितीनंतर सीबीआयकडून वेगाने तपास सुरू झाला. त्यानंतर आरोपींची धरपकड करण्यात आली. 2018 मध्ये तपासाला वेग आल्यानंतर अखेर सहा वर्षात प्रकरणाचा निकाल समोर आला आहे.