सातपुडा पर्वत रांगामध्ये वसलेले महाराष्ट्रातील दुसर्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे तोरणमाळ. तोरणमाळपासून २० किलोमीटर अंतरावर अतिदुर्गम भागातील झापी-बोदीबारी पाडा येथील मिलेश झुंगाल्या पावरा हा शाळाबाह्य विद्यार्थी २०१७ मध्ये शाळेत प्रवेश घेत जागतिक स्तरावरील सायन्स लॅब पाहण्यासाठी जपानला आज १५ जून रोजी रवाना झाला. तोरणमाळ परिसरातून विदेशात जाणारा मिलेश हा पहिलाच विद्यार्थी आहे. मोठ्या शहरांसाठी विदेशात जाणे ही मोठी बाब नसली तरी सातपुड्यातील दुर्गम भागातील शाळाबाह्य विद्यार्थ्याने शाळेत प्रवेश घेत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून तो जपानला निघाला, ही बाब आकांक्षीत जिल्हा असलेल्या नंदुरबारला नक्कीच प्रेरणादायी आहे.
शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पायपीट सुरूच
नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. अनेक आघाड्यांवर असलेल्या जिल्ह्यांच्या तुलनेत पिछाडीवर असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी आकांक्षित जिल्हा म्हणून घोषणा केली. जिल्ह्यात स्थलांतरासह अनेक समस्या वर्षानुवर्ष आहेत. जिल्ह्यातील दुर्गम भागात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पायपीट सुरूच असते. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही सातपुड्यातील अनेक विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले आहे. यात आणखी निलेश पावरा या विद्यार्थ्याचे नाव वाढले आहे. महाराष्ट्राच्या नकाशातील उत्तर दिशेला शेवटचा जिल्हा म्हणजे नंदुरबार आहे.