सोलापूर : महापालिका निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता व निष्पक्षता राखण्यासाठी एसएसटी तपासणी केंद्रांची (स्थिर देखरेख पथक) भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, प्रत्येक वाहनाची नियमाप्रमाणे तपासणी करावी, कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. संबंधित अहवाल तात्काळ वरिष्ठ कार्यालयास सादर करावेत, अशा स्पष्ट सूचना आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज विजापूर रोड, होटगी रोड येथील स्थिर देखरेख पथक केंद्राची (एसएसटी – Static Surveillance Team) पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार निवडणूक विभागाचे अधिकारी, पोलीस विभागाचे प्रतिनिधी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
निवडणूक काळात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, बेकायदेशीर रोख रक्कम, मौल्यवान वस्तू, दारू, साहित्य यांची वाहतूक रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला.या पाहणीदरम्यान तपासणी केंद्रावर कार्यरत असलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी आयुक्तांनी चर्चा केली. शहरामधील प्रमुख मार्गांवर होणाऱ्या वाहतुकी संदर्भात तपासणी कशी केली जाते, वाहनांची तपासणी करताना कोणत्या बाबींची दक्षता घेतली जाते, संशयास्पद वाहतूक आढळल्यास करण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर माहिती त्यांनी घेतली.
























