न्यू ईयर पार्टीवरुन परतत असलेल्या मित्रांच्या कारला अपघात झाला. कारमधील ८ पैकी ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. कारवरील नियंत्रण सुटल्यानंं हा अपघात झाला.
झारखंडच्या जमशेदपूरमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना घडली आहे. रस्ते अपघातात ६ मित्रांचा मृत्यू झाला. बिष्टूपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्किट हाऊस परिसरात हा अपघात झाला.
भरधाव वेगानं धावणाऱ्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं. आधी कार दुभाजकाला धडकली. मग ती झाडावर जाऊन आदळली. या अपघातात ६ तरुणांचा मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की त्याचा आवाज दूरवर ऐकू गेला. आवाज ऐकून लोक घरातून बाहेर आले.
स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यांनी घटनास्थळ गाठूव मृतदेह ताब्यात घेतले. ते शवविच्छेदनासाठी पाठवले. कारमधील तरुण पार्टी करण्यासाठी कुठे गेले होते त्याचा शोध पोलीस घेत आहेत. कारमधील तरुण नववर्षाच्या स्वागताच्या पार्टीसाठी हॉटेलमध्ये गेले होते. ते तिथून परतत होते. सर्व तरुण दारुच्या नशेत होते. हीच चूक त्यांना भोवली.
सकाळ होताच लोकांनी अपघातस्थळी गर्दी केली. कारमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला. सर्व तरुण आरआयटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कुलुप्तांगाचे रहिवासी आहेत. या अपघातात दोन जण चमत्कारिकपणे बचावले. कारमध्ये एकूण ८ जण होते. त्यातील ६ जणांचा जागीच शेवट झाला. दोन तरुणांचा जीव वाचला. ते दोघे बाबा आश्रम परिसरात राहणारे आहेत.