गेल्या काही महिन्यात अनेक मराठी सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधला आणि आता या यादीमध्ये आणखी एक नाव जोडलं जाणार आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील अनेक जोड्या गेल्या काही महिन्यात लग्नबंधनात अडकल्या. स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी, गौतमी देशपांडे-स्वानंद तेंडलकर, मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे, सुरुची अडारकर-पीयूष रानडे या कलाकारांनी गेल्या एक-दोन महिन्यात लग्नगाठ बांधली. आता लवकरच मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता लग्न करणार आहे. त्याच्या केळवणाचे फोटोही समोर आले असून अभिनेत्याच्या होणाऱ्या पत्नीने लग्नाची तारीखही ठरल्याचे सांगितले.
‘टाइमपास’, ‘बालक-पालक’, ‘ताजा खबर’, ‘दृश्यम’ अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणारा अभिनेता प्रथमेश परब लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून क्षितीजा घोसाळकरसोबत रिलेशनशिपमध्ये होता. आता ही जोडी लवकरच लग्न करणार असून अलीकडेच त्यांचे केळवण पार पडले. त्यामुळे त्यांच्या लग्नसोहळ्याची तारीख दूर नाही एवढं नक्की. दरम्यान क्षितीजाने तिच्या इन्स्टाग्रामवर हे केळवणाचे फोटो शेअर केले आहेत. तिने ही पोस्ट शेअर करताना लग्नाची तारीख सांगितली नसली तरी तारीख काय असेल याची हिंट दिली आहे.
काय आहे केळवण स्पेशल पोस्ट?
क्षितीजा आणि प्रथमेश परब यांच्या केळवणासाठी खास बेत करण्यात आला होता. फुगे, फुलांची आरास आणि चॉकलेट्सही सजवण्यात आलेले. क्षितीजाने या केळवणाचा एक फोटो शेअर करत असे कॅप्शन दिले आहे की- #pratija चं ठरलंय हा! बाकी तारीख लवकरच कळवतो. (PS- तारीख खूपच Special आहे. कॅप्शनमध्येच हिंट आहे. कमेंटमध्ये ओळखून सांगा.) तोवर… नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा Happppppy “२०२४”.
क्षितीजाने कमेंट करताना ‘२०२४’ या आकड्यांना अधोरेखित केल्याने त्यामध्येच त्यांच्या लग्नाची तारीख दडलेली असावी असा अंदाज आहे. यावरुन अनेकांनी कमेंट करत त्यांच्या लग्नाची तारीख व्हॅलेंटाइन डे अर्थात १४ फेब्रुवारी असेल असा अंदाज बांधला आहे. Pratija च्या केळवणाचे फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना या नव्या जोडीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.