राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी आपल्या काकांना गुरुवारी धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारीही मिळविली. या पक्षप्रवेशाने शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांमधील संबंधांची चर्चा नव्याने होऊ लागली आहे.
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. सुरुवातीला सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबतच राहणार, असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. मात्र, शब्द फिरवत डॉ. शिंगणे यांनी अजित पवार गटाची वाट धरली. मतदारसंघात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस तग धरून उभी राहते की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला होता.
दरम्यान, गत काही दिवसांपूर्वी सहकार महर्षी दिवंगत भास्कर शिंगणे यांची नात व आ. शिंगणे यांची पुतणी गायत्री गणेश शिंगणे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. आपण करत असलेल्या कामांचा आढावा त्यांच्यापुढे मांडला. गायत्री यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर बुलढाणा जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
काका विरुद्ध पुतणी लढाईची शक्यता
राज्याच्या राजकारणात आतापर्यंत काका विरुद्ध पुतण्या अशी लढाई नागरिकांनी पाहिली आहे. आता सिंदखेड राजा मतदारसंघात काकाविरुद्ध पुतणी असा सामना होण्याची शक्यता आहे.