सोलापूर : मराठीमध्ये ‘टोप्या घालणे’ म्हणजे ‘फसवणे असा अर्थ होतो. राजकारणात एकमेकांना टोप्या घालणे हा प्रकार मजेशीर पद्धतीने बोलला जातो. असाच विविध पक्षातील राजकीय नेते, सर्व समाजातील मान्यवरांना टोप्या घालण्याचा प्रकार एका कार्यक्रमात पाहायला मिळाला.
हा कार्यक्रम होता काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित कौमी एकता मंच यांनी सोलापूर शहरातील सर्व धर्मातील मान्यवर राजकीय पक्षांची घेतलेली बैठक.
ही बैठक काँग्रेस नेते शौकत पठाण यांच्या इम्पेरियल गार्डन या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आडम मास्तर, महेश कोठे, तौफिक शेख, दत्ता सुरवसे या मोठ्या नेत्यांसह सर्वपक्षीय नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
या कार्यक्रमात उपस्थित सर्वच मान्यवरांना पांढरी टोपी घालून स्वागत करण्यात आले. शौकत पठाण यांनी स्वतः काही जणांच्या डोक्यावर टोपी घातली तर काहींच्या हातात टोपी दिली. ही टोपी घेऊन जेव्हा शौकत पठाण सुशीलकुमार शिंदे यांच्या जवळ गेले तेव्हा शिंदे यांनी टोपी हातात घेत मजेशीर काही तरी बोलून गेले, त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला बसलेल्या नेत्यांमध्ये सुद्धा एकच हशा पिकला. जेव्हा या टोप्या नेत्यांनी आपापल्या डोक्यावर घातल्या तेव्हा ते एकमेकाकडे बघून चांगलेच हसत होते. सुशीलकुमार शिंदे यांनी आडम मास्तर यांच्या हातात हात देऊन फोटोसेशन ही केले. शौकत पठाण यांच्या टोप्यावरून या कार्यक्रमात अनेक नेत्यांना मात्र चांगल्याच गुदगुल्या झाल्याचे पाहायला मिळाले.