शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये महायुतीकडून पैसेवाटप होत असल्याचा आरोप केला आहे. “मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण!” असं कॅप्शन देत संजय राऊत यांनी एक्स सोशल मीडिया अकाऊण्टवरुन एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने नाशकात आले, त्यावेळचं दृश्य पाहायला मिळत आहे. ९ बॅगांमधून १२ ते १३ कोटी रुपये नाशिकला आले, असं संजय राऊत म्हणाले.
“मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण! नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले.. नुसता पै पाऊस… दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहात आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहोचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे.” असं संजय राऊत यांनी व्हिडिओ ट्वीट करताना लिहिलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले ?
संभाजीनगर, पुणे यासारख्या ठिकाणी काल रात्रीपासून पैशाचं वाटप, देवाण-घेवाण स्पष्ट दिसत आहे. हे आरोप नाहीत, स्पष्ट दिसतंय. धंगेकर पोलिस स्टेशनसमोर ठिय्या मांडून बसले आहेत. मोदी-फडणवीसांनी हे पाहून कायद्याची बूज राखावी. नगरमध्ये खुलेआम पैसे वाटताना लोकांनी विखेंच्या चिरंजीवांना पकडलंय. मुख्यमंत्र्यांच्या नाशकातील आगमनाचा व्हिडिओ मी ट्वीट केलाय, दोन तासांसाठी जड बॅगा कसल्या आहेत? ५०० सफारी-सूट घेऊन आले का? कोणत्या हॉटेलात गेल्या? याचे व्हिडिओ मी देणार आहे. आमच्या गाड्या तपासतात, खर्गेंचं हेलिकॉप्टर तपासलं जातं, मग मुख्यमंत्री-गृहमंत्री यांच्या खोक्यांचा तपास कोण करणार? ईडी ही मोदींची लुटारु टोळी आहे. त्यांना दिसत नाही का? असे सवाल संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
दरम्यान, पैसे वाटून मतदान करायचं असतं, तर टाटा-बिर्ला पंतप्रधान झाले असते, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे.
याआधी बारामती लोकसभा मतदारसंघात पैसे वाटप होत असल्याचा आरोप झाला होता. रोहित पवार यांनी पीडीसीसी बँकेची वेल्हे शाखा मध्यरात्रीपर्यंत सुरु असल्याचा दावा व्हिडिओ शेअर करत केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई करत मॅनेजरला निलंबित केलं. तर पुण्यातील काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनीही महायुतीवर पैसेवाटपाचा आरोप करत पोलीस स्टेशनबाहेर धरणं धरली होती.