तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : पारतंत्र्यातही तिरंगा ध्वज फडकलेल्या ऐतिहासिक अशा नवी पेठेतील महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाची हेरिटेज इमारत तिरंगा विद्युत रोषणाईने उजळली. रंगरंगोटी आणि स्वच्छता कामांमुळे हा परिसर चकाचक आणि मनोहारी झाला आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासाठी तत्परता दाखवली.
स्वातंत्र्यलढ्याचा क्रांतिकारी इतिहास असलेल्या या प्रेरणादायी इमारतीसमोर फोटो काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचे दिसून आले
जुन्या नगरपालिकेची ही ऐतिहासिक इमारत आहे. ही वास्तू स्वातंत्र्यलढ्याची साक्ष देणारी ही इमारत आहे. मे 1930 मध्ये पारतंत्र्यातही तिरंगा ध्वज डौलाने फडकविण्यात आला होता. दि. 6 एप्रिल 1930 रोजी सोलापूर नगरपालिकेवर राष्ट्रीय झेंडा फडकवण्यात यावा असा ठराव करण्यात आला. त्यानुसार देशभक्त अण्णासाहेब भोपटकर यांच्या हस्ते सध्याच्या नवी पेठ येथील नगरपालिकेच्या इमारतीवर राष्ट्रीय निशाण फडकवण्यात आले.
पारतंत्र्यातही दि. 9 ते 12 मे 1930 दरम्यान सोलापूरकरांनी स्वातंत्र्य उपभोगले. आक्रमक क्रांतिकारी लढा उभारल्याने ब्रिटिशांनी सोलापुरात मार्शल लॉ पुकारला. मार्शल लॉच्या काळात नगरपालिकेवर उभारण्यात आलेले राष्ट्रीय निशाण उतरावे असे फर्मान ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सोडले मात्र त्याला न जुमानता सभासदांनी सर्वांनुमते केलेली कृती त्यांच्या संमतीशिवाय मी मागे घेऊ शकत नाही असे बाणेदार उत्तर देऊन निशाण उतरवण्यास तत्कालीन नगराध्यक्ष माणिकचंद शहा यांनी स्पष्ट नकार दिला. त्याबद्दल त्यांना कारावास आणि दंडाची शिक्षा भोगावी लागली असा हा क्रांतिकारी इतिहास या ऐतिहासिक वास्तूचा आहे.आजही ही वास्तू सर्वांना प्रेरणा देत आहे.
क्रांतिकारी इतिहास असल्याने या हेरिटेज इमारतीवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने तत्कालीन आयुक्त पि शिवशंकर यांनी विद्युत रोषणाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या ऐतिहासिक वास्तूवर विद्युत रोषणाई करण्याची ही परंपरा सुरू ठेवण्यात आली. महापालिका विद्युत विभागाचे अभियंता महादेव इंगळे यांच्या माध्यमातून दरवर्षी आता ही तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात येते.
Post Views: 28