जालना – पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या शिवनेरी किल्ला येथून पायी प्रवास करत हेमंत सूर्यवंशी हा तरुण अवलिया आज गुरुवारी जालन्यात दाखल होत जालन्याचे माजी आमदार तथा भाजपा नेते कैलास गोरंटयाल यांची गुरू गणेश भवनमध्ये भेट घेऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या.
धुळे जिल्ह्यातील कापडनेर येथील मूळ रहिवासी असणारा हा तरुण गावाकडील दहा ते बारा सहकारी मित्रांसह मागील कालावधीत पोलिस भरतीसाठी मुंबई येथे गेला होता.
घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे मुंबई सारख्या मोठ्या शहरात महागडं जेवण करणे दुरापास्त होते. अशा कठीण वेळी जालन्याचे तत्कालीन आमदार कैलास गोरंटयाल यांनी पोलिस भरतीसाठी आलेल्या या सर्व तरुणांची अडचण लक्षात घेऊन त्यांना आपल्या आमदार निवासातील खोलीत राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती. या उपकाराची परतफेड करणे शक्य नसले तरी कैलास गोरंटयाल यांना दैवत मानून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला येथून पायी प्रवास करत जालना येथे आल्याचे हेमंत सूर्यवंशी यांनी सांगितले.
दि. ४ एप्रिल २०२६ रोजी शिवनेरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी दर्शन घेऊन आपण पायी प्रवास सुरू केला होता. दररोज सकाळी ५ ते दुपारी १२ पर्यंत आणि त्यानंतर दुपारी ३ ते रात्री ९ असा सहा दिवस पायी प्रवास करत आपण जालना येथे सहाव्या दिवशी पोहचलो असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. दरम्यान, सूर्यवंशी यांनी वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देण्यासाठी चक्क सहा दिवस पायी प्रवास केल्यामुळे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी सूर्यवंशी यांना मिठी मारत त्यांचे खास आभार व्यक्त केले.
यावेळी गुरू गणेश भवनमध्ये उपस्थित असणाऱ्या प्रतिष्ठित मान्यवरांनी देखील सूर्यवंशी यांच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल कौतुक केले.
























