उन्हाळी सुट्टया सुरू होताचा बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची एसटी स्थानकांवर मोठी गर्दी उसळते. त्यामुळे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे विभाग नियंत्रण कार्यालयाकडून प्रत्येक स्थानकातून जादा बस सोडण्याचे नियोजन केले जाते.त्यानुसार यंदा पहिल्या टप्यात 63 जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वाढत्या गर्दीनुसार बससंख्या वाढविण्यात येणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
राज्य परिवहन महामंडळ (एसटी) सर्वसामान्यांच्या प्रवाशाची जीवनवाहिनी मानली जाते. लालपरीपासून अलिशान बसपर्यंतचा प्रवास सुखाचा आणि सुरक्षित होतो. त्यात महिला, ज्येष्ठ नागरिक यांना दिलेल्या सवलतींमुळे एसटीला प्रवाशांची मोठी गर्दी वाढली आहे.
आता शाळांना उन्हाळी सुट्टी लागल्याने यात्रा, सहली यांसह कुटुंबासह पर्यटनाला जाणारे प्रवासी एसटीने जाण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे मागील दहा दिवसांपासून स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनवर प्रवाशांनी गर्दी वाढू लागली आहे. शनिवार आणि रविवारी ही गर्दी अधिक वाढली असून, वाढती गर्दी लक्षात घेऊन जादा गाड्या सोडण्यात येत आहे.