भिवंडी तालुक्यातील पडघा येथे संत संमेलन आणि हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस मुख्य मार्गदर्शक म्हणून तेलंगणा येथील प्रक्षोभक वक्तव्य करण्यामुळे चर्चेत असणारे आमदार टी राजा सिंह हे उपस्थित होते. या सभेत त्यांनी नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप ४०० पार झाले असते तर भारत हिंदुराष्ट्र झाले असते असे सांगताच उपस्थितांनी जयजयकार केला. यावेळी व्यासपीठावर बालयोगी सदानंद महाराज, महंत शिर चिदानंद सरस्वती, स्वामी गोविंदगिरी, महंत फुलनाथ बाबा, आयोजक शिवरूपानंद स्वामी उपस्थित होते.
या सभेसाठी तालुक्यातून हजारोंच्या संख्येने हिंदू धर्मीय उपस्थित होते. या हिंदू धर्मसभेत धर्मांतर बंदी कायदा पारित करण्यात यावा, वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्यात यावा, लव जिहाद विरोधी कायदा मंजूर करावा, गोहत्या बंदी सक्त करून अंमलबजावणी व्हावी, बेकायदेशीर भूमी अतिक्रमण हटविण्यात यावे, असे विविध ठराव पारित करण्यात आले. या सभेत बोलताना टी राजा सिंह यांनी महाराष्ट्रात मठ मंदिर सुरक्षित नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ३७० किल्ले जिंकले पण दुर्दैव म्हणजे शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात १०० किल्ल्यांवर मशीद आणि दर्गा बनविण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुका आहेत. त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांना आवाहन आहे, त्यांनी किल्ल्यांवरील कब्जा साफ करावा.
ते म्हणाले की, महाराष्ट्रात १ लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. तर भारतात १० लाख एकर जमीन वक्फ बोर्ड कडे आहे. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी वक्फ बोर्ड कायदा संपवून टाकावा. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हिंदूं साठी रुग्णालय, क्रीडांगण, महाविद्यालय, घर बनवा असे आवाहन केले. शिवाय हिंदू मुस्लिम भाई भाईचा नारा देत मुस्लिमांकडून लव्ह जिहाद राबवला जातो. महाराष्ट्रात लव्ह जिहाद, गो हत्या, धर्मांतर यावर कायदा का होत नाही, असा सवाल विचारीत हिंदू एक झाला नाही तर भारत कधीच हिंदू राष्ट्र होणार नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.