बार्शी – सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या प्रचंड व संततधार पावसामुळे बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीची दखल घेऊन शासनाने बाधीत शेतकऱ्यांना मदत निधी जाहीर केला होता. संबंधित निधी शासनाकडून प्राप्तही झाल्याची माहिती असून दिवाळीपूर्वी तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते.
मात्र दि. २९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत बार्शी तालुक्यातील निम्म्या शेतकऱ्याच्या खात्यात नुकसानभरपाई जमा झालेली नाही. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हनुमंत भोसले यांनी इशारा दिला आहे की, जर दि. ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंत सर्व बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचा निधी जमा झाला नाही, तर तहसील कार्यालय, नायब तहसीलदार कार्यालय तसेच मदत पुनर्वसन विभाग यांच्या कार्यालयास “ताळे ठोक आंदोलन” करण्यात येईल.
शेतकऱ्यांनी प्रशासनाला आवाहन केले आहे की, शासनाने दिलेला निधी त्वरित वितरीत करून कायद्याचे पालन करावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल. निवेदन देते वेळी तालुक्यातील शेतकरी संघटनेची कार्यकर्ते उपस्थित होते


















