मुंबईत एका उच्चपदस्थ आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंत्रालयासमोरील इमारतीत तिने आत्महत्या केल्याची माहिती आहे. उच्च आणि तंत्र शिक्षणचे सचिव आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आयएएस अधिकारी विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे. मंत्रालयाच्या समोर एक सुनीती इमारत आहे, या इमारतीत काही आयएएस अधिकारी राहतात तर काही मंत्री देखील राहतात. याच इमारतीत विकास रस्तोगी यांच्या मुलीने इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. तिने हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. यामागे घरगुती कारण आसवं अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आत्महत्येमागील कारण शोधण्याचं काम पोलीस करत आहेत.
सुसाईड नोटमध्ये काय?
याप्रकरणी पोलिसांना घटनास्थळावरुन एक सुसाईड नोटही सापडली आहे. लिपी रस्तोगी असं या २६ वर्षीय मुलीचं नाव आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात तिने म्हटलं की, यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये. अभ्यासात ज्याप्रकारे तिला प्रगती करायची होती ती होत नव्हती, यश प्राप्त हो नव्हते, म्हणून तिने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. आई-वडील हे उच्च पदावर असल्याने मुलांवरही तो दबाव असतो आणि जेव्हा ते त्या अपेक्षांवर खरे उतरत नाही तेव्हा ते असे टोकाचे निर्णय घेत असल्याचं याआधीही घडलं आहे. लिपीसोबतही असंच काहीसं घडलं असावं. आई-वडील दोघेही आयएएस अधिकारी असल्याने तिच्यावरही तो दबाव होता, तिला जे यश अपेक्षित होती ती मिळवता येत नसल्याने तिने हा धक्कादायक निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.