नळ कनेक्शन घेताना पाणी विकणार नाही, कमी प्रेशर आला तरी तक्रार करणार नाही व पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार लावणार नाही, असे प्रत्येकाकडून लेखी घेतले जाते. मात्र, सोलापूर स्मार्ट सिटीतील एक लाख ३२ हजार नळ कनेक्शन धारकांपैकी तब्बल सव्वालाख कुटुंबातील लोक नळाला इलेक्ट्रिक मोटार लावूनच पाणी भरतात अशी वस्तुस्थिती असल्याचे खुद्द महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच सांगितले.
उजनी धरण भरलेले असो किंवा रिकामे, सोलापूरकरांना जवळपास २० वर्षांपासून नियमित पाणी मिळत नाही. दुसरीकडे शहराचा विस्तार झाला आणि नळ कनेक्शनही वाढले, मात्र पाणीपुरवठ्याची अंतर्गत पाइपलाइन लोकसंख्येच्या प्रमाणात बदलली गेली नाही. शहरातील विडी घरकूल, प्रियांका नगर, बॉम्बे पार्क, वसंत नगर, सुशील नगर, आंबेडकर नगर (देगाव रोड), निराळे वस्ती, यश नगर, शेळगी, जुळे सोलापूर भागात अशी स्थिती आहे.सर्वजण नळाला इलेक्ट्रिक मोटार लावतात हे माहिती असतानाही महापालिकेकडून डोळेझाक केले जाते. कारण, नियमित व पुरेशा दाबाने पाणी देता येत नाही. स्मार्ट सिटीतील ही दुरवस्था समांतर जलवाहिनी झाल्यावर तरी सुधारेल अशी सर्वांनाच अपेक्षा आहे. नोव्हेंबरमध्ये समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर नववर्षात (जानेवारी २०२५) किमान दोन दिवसाआड आणि वेळेत (अवेळी नाही) पाणी मिळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.