सोलापूर : महापालिका महिला व बालकल्याण विभाग तसेच DAY-NULM , युसीडी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित महिला महोत्सवात विविध स्टॉलवर दोन दिवसात अंदाजे ३ लाख ५० हजार रुपये उलाढाल झाली आहे. शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज बुधवारी या महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, या अंतर्गत रस्सीखेच, संगीत खुर्ची यासह विविध स्पर्धां उत्साही वातावरणात पार पडल्या.
सोलापूर महापालिका आवारात इंद्रभवन इमारतीच्या बाजूला विविध ४० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. तर दोन स्टॉलवर आरोग्य विषयक जनजागृती करण्यात येत आहे. ९ ते ११ मार्च २०२६ या कालावधीत हा महोत्सव संपन्न होत आहे.महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांचा प्रचार-प्रसार करणे आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हा महोत्सवाचा मुख्य उद्देश
आहे. येथे महिला बचत गट उत्पादित वस्तू व खाद्यपदार्थांचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या महोत्सवाच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध झाली आहे. येथील विविध स्टॉलवर सोमवारी दीड लाख रुपये आणि मंगळवारी दोन लाख रुपये असे एकूण दोन दिवसात अंदाजे ३ लाख ५० हजार रुपयाची विक्रीतून उलाढाल झाली आहे.
या निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. होम मिनिस्टर अंतर्गत विविध स्पर्धा पार पडल्या आहेत. रस्सीखेच, संगीत खुर्ची या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. सहाय्यक आयुक्त मनीषा मगर यांनी या दोन्ही स्पर्धेच्या ठिकाणी भेट दिली. स्पर्धकांना प्रोत्साहन दिले. दि. ११ मार्च २०२६ रोजी सायं. ६ वाजता वैयक्तिक गीत गायन , फॅशन शो / वेशभूषा स्पर्धा होणार आहेत.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण ११ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी महिला व बालकल्याण अधिकारी अजितकुमार खानसोळे, युसीडीच्या उज्वला गणेश, समीर मुलानी यांच्यासह समूह संघटक प्रयत्नशील आहेत. वरिष्ठ लिपिक अशोक बिराजदार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. नागरिकांनी प्रदर्शनास भेट देऊन खरेदीद्वारे महिला उद्योजिकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महापौर विनायक कोंड्याल व आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
प्रदर्शनामध्ये या वस्तू आणि साहित्याचे आहेत स्टॉल्स
प्रदर्शनामध्ये हाताने बनवलेले आरोग्यदायी व स्वच्छ खाद्यपदार्थ, विणकाम व शिवणकामाच्या वस्तू, लाकडी कोरीव काम, अगरबत्ती, धूप, मसाले, चटण्या, पापड, ड्रेस मटेरियल, साड्या, कडक भाकरी, शेंगा पोळी, धपाटे, नाचणी-ज्वारी बिस्कीट, हेल्थ ड्रिंक पावडर, हर्बल तेल, झाडू-खराटा, मूर्ती, कॉस्मेटिक साहित्य तसेच विविध प्रकारचे खाद्य स्टॉल्स (वडा पाव, पाणीपुरी, चायनीज पदार्थ, ज्यूस, कॉकटेल पेय इ.) उपलब्ध असणार आहेत. सर्व वस्तू योग्य दरात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

























