भारतीय शेअर बाजारात ऐतिहासिक तेजीचा कल दिसून येत आहे. शेअर मार्केटची, शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी शानदार ओपनिंग झाली असून आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी विक्रमी तेजीनंतर २४ मे २०२४ रोजी बाजारातील विक्रमी वाढ सुरू राहिली असून सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी पुन्हा उच्चांक गाठला.
शुक्रवारी, बाजार ओपनिंगच्या काही मिनिटांतच शेअर बाजाराने गरुड भरारी घेतली आणि इतिहास रचला. बाजाराच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्सने प्रथमच ७५,५०० अंकांचा टप्पा ओलांडला असून निर्देशांकाने ऐतिहासिक शिखरावर उडी घेतली. याशिवाय एनएसई निफ्टीने पहिल्यांदा २३ हजार अंकांची पातळी ओलांडली आणि सध्या २३,००४.०५ अंकांचा उच्चांक गाठला.
सेन्सेक्स-निफ्टीचा विक्रमी उच्चांक
शुक्रवारी सेन्सेक्सने ७५,५८२.२८ अंकाचा नवीन विक्रमी उच्चांक गाठला असून NSE निफ्टीने २३,००४.०५ अंकाच्या विक्रमी उच्चांकावर भारे घेतली. शुक्रवारच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी सतत नवीन विक्रमी पातळी गाठत आहेत. याशिवाय क्षेत्रीय निर्देशांकांमद्ये PSU बँका, फार्मा आणि भांडवली वस्तू निफ्टीवर वेगाने व्यवहार करताना दिसत आहेत.
शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच मिडकॅप निर्देशांकाने ५२,५०० अंकांची पातळी ओलांडून नवा विक्रमही रचला तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांच्या वाढीमुळे देशांतर्गत शेअर बाजाराला दीर्घ काळापासून पाठिंबा मिळत आहे, ज्याच्या जोरावर भारतीय बाजार ऐतिहासिक झेप घेत आहेत. बाजाराच्या तेजीत बजाज फायनान्स, एल अँड टी, टाटा स्टील, स्टेट बँक, विप्रो, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व्ह, अल्ट्राटेक यांनी मोठे योगदान दिले.
शेअर मार्केटची अडखळत सुरुवात
ओपनिंग सत्रात बाजारात सुस्ती दिसून आली आणि सेन्सेक्स ८२.५९ अंक घसरून ७५,३३५.४५ अंकांवर तर निफ्टीमध्ये सुरुवातीला ३६.९० अंकांची कमजोरी दिसून आली. मात्र बाजारातील घसरण फार काळ टिकली नाही निफ्टीने उंच उडी घेत २३ हजार अंकांची पातळी ओलांडली. यापूर्वी गुरुवारी बाजारात जबरदस्त तेजीचे वादळ पाहायला मिळाले. बीएसई सेन्सेक्स १,२०० हून अधिक अंकांनी वाढून ७५,४०० अंकावर उसळला, तर निफ्टी २२,९९३ अंकांवर मजल मारली होती. दरम्यान, बीएसईचे बाजार भांडवल विक्रमी उच्चांक गाठले असून प्रथमच ४२१.०९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
कोणते शेअर तेजीत
बीएसई सेन्सेक्सच्या ३० समभागांपैकी केवळ ८ शेअर्समध्ये तेजी दिसत असून २२ समभागांमध्ये घसरण होत आहे. सर्वात मोठी घसरण टीसीएसच्या शेअरमध्ये झाली आणि जवळपास १% घसरून ३,८५७ रुपयांवर आला. तर L&T च्या समभागात १.२०% सर्वाधिक वाढ दिसून येत आली ३,६२९ रुपयांवर व्यवहार करत आहे.