सोलापूर – महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२६ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया उत्साहात सुरू झाली. शहर काँग्रेस कमिटीच्या आयोजनाखाली प्रभाग क्रमांक १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ०९, १०, ११, २०, २१, २३, २४, २५ व २६ मधील इच्छुकांच्या मुलाखती संपन्न झाल्या.
मुलाखतींना मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी उपस्थिती लावली. विशेष म्हणजे, इच्छुक उमेदवार आपल्या समर्थकांसह ढोल–ताशे, हलगींच्या कडकडाटात आणि प्रचंड उत्साहात मुलाखतीस दाखल झाले होते.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, आदींनी इच्छुकांना विविध प्रश्न विचारात त्यांच्याकडून उत्तर जाणून घेतले.. यामध्ये प्रभागाची लोकसंख्या किती? किती वर्षापासून पक्षाचे काम करता? प्रभागात मतदारांची संख्या किती आहे ? असे विविध सामाजिक प्रश्न विचारून इच्छुकांना बोलते केले.
या मुलाखतींसाठी खासदार प्रणिती शिंदे, सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी महापौर संजय हेमगड्डी, आरिफ शेख, सुशीलाताई आबुटे, अलकाताई राठोड, प्रवक्ते व माजी नगरसेवक अशोक निंबर्गी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, महिला काँग्रेसचे अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, देवाभाऊ गायकवाड, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जुबेर कुरेशी, प्रदेश चिटणीस श्रीशैल रणधिरे, राहुल वर्धा, शकील मौलवी, सेवादलाचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मुलाखतीदरम्यान इच्छुक उमेदवारांची संघटनात्मक कामगिरी, जनसंपर्क, सामाजिक योगदान, निवडणूक लढवण्याची तयारी यासह त्यांच्या प्रभागातील प्रश्न, स्थानिक समस्या, संभाव्य विकास योजना आणि जनतेशी संपर्काची कार्यपद्धती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक उमेदवाराकडून वैयक्तिक माहिती, प्रभागासाठी केलेल्या कामाचा कार्यअहवाल, सामाजिक समीकरणे तसेच संघटनात्मक व सामाजिक कार्याचा सखोल आढावा घेण्यात आला.
या मुलाखतींच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाकडून सक्षम, लोकाभिमुख, विकासाभिमुख दृष्टिकोन असलेले आणि पक्षाच्या विचारधारेशी निष्ठावान उमेदवार निवडण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. अनेक माजी नगरसेवकांसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, उच्च शिक्षित युवक–युवती तसेच सामाजिक व सहकार क्षेत्रातील इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे.
सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, प्रामाणिक व लोकाभिमुख नेतृत्व निवडण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून, काँग्रेस पक्ष आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
उर्वरित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दि.२३ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून घेण्यात येणार असून, संघटन बळकट करून जनतेशी थेट जोडलेले उमेदवार देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचे यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी स्पष्ट केले.



























