टेंभुर्णी – ऊस लागवडीच्या कालावधीत राज्य सरकारमधील वजनदार कारखानदार नेत्याने बहुतांश कारखानदारांना हाताशी धरून केळीचे दर पाडून शेतकर्यांचे शेकडो कोटी रूपयांचे नुकसान केले आहे. त्यामुळे सक्षम अधिकाऱ्यांच्या किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र एसआयटी नेमून केळीचे दर का अचानकपणे पडले याचा शोध घेऊन सुनियोजित षडयंत्राचा उलगडा करावा अशी मागणी शिवसेना माढा लोकसभा संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात संपर्कप्रमुख संजय कोकाटे म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक राजकारणी हे साखर कारखानदार असल्यामुळे त्यांनी कधीही फळबाग शेतीकडे लक्ष दिले नाही उलट उसाचे क्षेत्र कमी होणार नाही याची काळजी घेतली आहे. तरीसुद्धा सोलापूर जिल्ह्यातील बहाद्दर शेतकऱ्यांनी केळी,आंबा,द्राक्षे,पेरू आणि डाळिंब यांची लागवड करून खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेऊन स्वतःचा आणि परिसराचा विकास केलेला आहे. केळी तर महाराष्ट्रातील एक्सपोर्ट पैंकी 60 टक्के एक्सपोर्ट एकट्या सोलापूर जिल्ह्यातून आखाती देशात निर्यात केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत होते. यामुळेच वरचेवर उसाची लागवड क्षेत्र कमी होऊ लागले होते उसाची उपलब्धता कमी होत असल्यामुळे स्पर्धा होत आहे व उसास जादा दर द्यावा लागत आहे त्यामुळेच साखर कारखानदार चिंतित झालेले आहेत.
ऑक्टोबर नोव्हेंबर ,डिसेंबर हा ऊस लागवडीचा कालावधी असतो व त्याच काळात सुनियोजितपणे सरकारमधील वजनदार कारखानदार नेत्याने बहुतांश कारखानदारांना हाताशी धरून केळीचे दर पाडून शेतकऱ्यांना केळी पिकापासून परावृत्त करण्याचा डाव खेळला गेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. अनेकांनी लागवड केलेले पीक मोडले आहे वर्षभर पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेले पीक मातीमोल भावाने विकावे लागले असून अनेक शेतकर्यांनी केळी पिक मातीत गाडले आहे.
सध्या बाजारपेठेत केळीची मागणी कमी झालेली नाही अथवा पुरवठा जास्त झालेला नाही.बाजारपेठेत इतर फळांची उपलब्धता नाही त्यामुळे कुठलेही ठोस कारण नसताना एक्सपोर्ट करणाऱ्या मोठ्या कंपन्या व व्यापाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्यावर दबाव टाकून केळीचे दर दहा दिवसात तीस रूपयांवरून पाच रुपयांवर खाली आणले. शेतकऱ्यांना केळी खोडवा पीक तर फुकट द्यावे लागले किंवा गाडून टाकावे लागले या घटनेमुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत. त्यांना काय झालं आणि कशामुळे दर पडले हे कळालेच नाही. गेल्या अनेक वर्षापासून केळीचे पीक घेत असताना असे अचानकपणे कधीच दर पडले नव्हते. शंभर टक्के घडवून आणलेले षडयंत्र आहे हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलेले आहे आणि हे सर्व साखर कारखानदार लॉबीने केले आहे अशी शंका केळी उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत.त्यामुळे सक्षमअधिकाऱ्यांच्या किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमून केळीचे दर का अचानकपणे पडले याचा शोध घेऊन सुनियोजित षडयंत्राचा उलगडा करावा तसेच तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी निवेदनात केली आहे.


























