वडा पाव ही मुंबईची जान आहे असं म्हटलं जातं. १२ ते १५ रुपयांत मिळणारा हा पदार्थ मुंबईत राहणाऱ्या कित्येक गरीबांना जिवंत राहण्याची प्रेरणा देतो. अनेक मोठमोठे कलाकार, सेलिब्रिटी, खेळाडू, नेते हा वडापाव खाऊनच लहानाचे मोठे झाले आहेत. असा हा गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच प्रेमात पाडणारा वडा पाव आता केवळ भारतापूरताच मर्यादित राहिलेला नाही. कारण मराठी माणसानं वडा पावला आता पार पाकिस्तानात सुद्धा पोहोचवलाय. होय, पाकिस्तानमध्ये वडापाव विकणाऱ्या एका मराठी माणसाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा वडापाव खाऊन आता पाकिस्तानी लोक सुद्धा ‘जय महाराष्ट्र’ म्हणत आहेत.
मराठी माणसानं लावला अटकेपार झेंडा
मराठी माणसानं अटकेपार झेंडा लावला असं आपण इतिहासात अनेकदा वाचलं आहे. या वाक्याची प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका मराठी कुटुंब पाहू शकता. हे कुटुंब कराचीमध्ये वडा पाव विकण्याचं काम करत आहे. परमेश श्री जाधव, त्यांच्या पत्नी मधू आणि वहिनी शारदा हे तीघं मिळून भारतीय पदार्थांचा स्टॉल चालवतात. या स्टॉलवर ते मसाला डोसा, व्हेजिटेबल नूडल्स, मोमोज, पाव भाजी, ईडली सांबार हे पदार्थ विकतात. पण त्यांच्या स्टॉलचं खरं आकर्षण आहे ते मुंबईचा वडा पाव. हा वडा पाव खाण्यासाठी पाकिस्तानी खवय्ये एकच गर्दी करताना दिसतात.
हा व्हिडीओ होतोय व्हायरल
जाधव कुटुंब पाकिस्तानात कसं पोहोचलं?
हे कुटुंब पाकिस्तानात कसं पोहोचलं? याबद्दल त्यांनी कुठलीही माहिती दिलेली नाही. पण बहुदा १७५७ साली मराठ्यांनी अटकमधील किल्ला जिंकला तेव्हा काही मराठी कुटुंब पाकिस्तानातच राहिली असावीत, अन् हे जाधव कुटुंब देखील त्यांच्याच पुढच्या पिढीमधील असेल अशी शक्यता व्हिडीओवर दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये काही नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ पाहून बहुसंख्य नेटकऱ्यांनी या मराठी कुटुंबाचं कौतुक केलं आहे. कारण ते शत्रू राष्ट्रात राहूनही आपली मराठी संस्कृती जपताना दिसत आहेत.