सोलापूर : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा आजच्या तरुण पिढीने जतन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुण्याचे विक्रम सोनवणे यांनी केले.
सम्यक विचार मंच आयोजित मिलिंद व्याख्यानमालेत “उद्योजक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले” या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अरुणकुमार इंगळे होते. यावेळी विचारमंचावर विजयानंद भालशंकर, रवी ढावरे, सुधीर चंदनशिवे, शांतीकुमार कांबळे, चंद्रकांत कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सोनवणे पुढे म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते दूरदृष्टीचे उद्योजकही होते. त्यांनी आपल्या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नातून पुणे शहरात अनेक शाळा सुरू करून शिक्षणाचा प्रसार केला आणि समाजासमोर आदर्श निर्माण केला. त्यांनी सामाजिक क्रांतीसाठी आपली संपत्तीही समाजाच्या विकासासाठी खर्च केली. त्यामुळे त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे ठरतात. फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांचे आकलन झाल्यास समाजाचा सर्वांगीण विकास होईल. तरुणांनी या महापुरुषांच्या कार्याचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घेणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अंजना गायकवाड यांनी केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक दत्ता गायकवाड, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, प्रभाकर भालेराव, लक्ष्मण चलवादी, प्रा. अर्जुन व्हटकर, प्रा. डॉ. वनिता सावंत-चंदनशिवे, अनिल जगझाप, अनिरुद्ध वाघमारे, प्रा. डॉ. सारीपुत्र तुपेरे, सुनिता गायकवाड, प्रा. अब्राईमकुमार, बापूसाहेब सदाफुले, पी. डी. सोनकांबळे, ॲड. दशरथ वलेकर आदींसह बहुसंख्य श्रोते उपस्थित होते.























