पंढरपूर – महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांनी दोन्ही महापुरुषांच्या स्मारकाची पाहणी केली. यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे, नगर अभियंता प्रकाश केसकर, नगरसेवक विनायक देवमारे, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष अभिराज उबाळे, उपाध्यक्ष विशाल मांदळे, कार्याध्यक्ष महेश मोटे उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष प्रणिता ताई भालके आणि मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी स्मारक परिसरात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी मोठ्या प्रमाणात महिला भगिनी अभिवादन करण्यासाठी येत असतात. मात्र या ठिकाणी स्वच्छतागृहाची सोय नसल्याचे दिसून आल्यानंतर नगराध्यक्ष प्रणिता भालके यांनी तात्काळ सुसज्ज असे स्वच्छतागृह आणि भंतेजी यांच्या राहण्यासाठी दोन स्वतंत्र खोल्या बांधण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील वृक्षप्रेमी होते. त्यामुळे पुतळा परिसरामध्ये शोभेचे वृक्ष लावण्यासाठी नगराध्यक्ष भालके यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे.
पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी किंवा दुरुस्तीसाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
























