सोलापूर – प्रत्येक बालकांचा पूर्णतः विकास होण्यासाठी शाळेत विविध उपक्रम राबवित असतो. या मोबाईल व ऑनलाइनच्या जमान्यात काही गोष्टी मुलांना प्रत्यक्ष कृतीतून समजावणे दिवसेंदिवस गरजेचे होत चालले आहे. अशा खूप सार्या गोष्टी आहेत ज्यांचा अनुभव मुलांना प्रत्यक्षपणे मिळत नाही, यावर प्रसिद्ध लेखक व. पु. काळे उपहासाने म्हणतात की, “मुलांना डोंगर,दर्या,नदी,नाले, खोरे प्रत्यक्ष पाहण्यास घेऊन जा नाहीतर उद्या ते स्पीड ब्रेकरलाच ‘डोंगर ‘समजतील”. वाक्य ऐकताना हस्यास्पद वाटत असले तरी ही सत्यस्थिती आहे. याचाच सारासार विचार करून व मुलांचे व्यवहारिक ज्ञान, भाषण कौशल्य वाढविण्यासाठी, भाजी मंडईची प्रत्यक्ष मांडणी करण्यात आली.
मोठ्या गटातील मुलांना प्रत्यक्ष विक्रीचा अनुभव येणे व लहान गटातील मुलांना भाज्यांची ओळख होऊन पालकांसोबत खरेदीचा आनंद मिळणे हा या भाजी मंडईचा उद्देश आहे. या मंडईचे उद्घाटन श्री. सिद्धेश्वर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वाले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री सिद्धेश्वर बालमंदिर पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका हेब्बाळ तसेच श्री सिद्धेश्वर बालमंदिर इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका कोरवार उपस्थित होत्या, शाळेतील पालकांचा उत्तम प्रतिसाद या बालमूंच्या भाजी मंडईस मिळाला.

























