ज्ञानाला कुठल्याही सीमा नसतात आणि भौतिक साधनं नष्ट केली तरी ज्ञान नष्ट होऊ शकत नाही, याचं मूर्तिमंत उदाहरण नालंदा विद्यापीठ आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बिहार मध्ये राजगीर इथं ऐतिहासिक महत्व असलेल्या नालंदा विद्यापीठाच्या नव्या परिसराचं उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज झालं. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
शिक्षणानं अर्थव्यवस्था आणि संस्कृतीची मूल्य बळकट होतात असं सांगत देशात शिक्षण क्षेत्रात होत असलेला कायापालट भारताला शिक्षण आणि ज्ञानाचं केंद्र म्ह्णून पुन्हा ओळख प्राप्त करून देईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. भारताच्या उज्ज्वल शैक्षणिक वारशाचं आणि विविधांगी सांस्कृतिक देवघेवीचं नालंदा प्रतिक आहे, हे केवळ एक नाव नाही तर आपली ओळख आहे, आपली प्रतिष्ठा आहे, एकेकाळच्या ज्ञान क्षेत्रातल्या सुवर्णयुगाचा प्रारंभ आपण आज करत आहोत, असं पंतप्रधान म्हणाले.
जागतिक ज्ञानकेंद्र होण्याचं ध्येय गाठण्याच्या दृष्टीनं भारताकडे जगातील सर्वात व्यापक आणि सुसज्ज कौशल्य प्रणाली असायला हवी, तसंच भारतामध्ये जगातील सर्वात प्रगत संशोधनाभिमुख उच्च शिक्षण प्रणाली व्हावी, यासाठी आमचं सरकार प्रयत्नशील आहे , असं त्यांनी सांगितलं . भारतीय विद्यार्थ्यांनी परदेशात उच्च शिक्षणासाठी न जाता, भारतातच उच्च शिक्षण घ्यावं यासाठी भारतातच उत्कृष्ट शिक्षण संस्था उभ्या राहात आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
आज संपूर्ण जगाचं लक्ष भारतावर आणि भारतातल्या युवकांवर आहे.अमृतकाळाची २५ वर्ष युवकांसाठी अमूल्य आहेत, असं सांगत आगामी काळात आपली तरुणाई संपूर्ण जगाचं नेतृत्व करेल तसंच नालंदा हे जागतिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र बनेल, असा विश्वास देखील पंतप्रधानांनी व्यक्त केला.
आगामी काळात नालंदा विद्यापीठ पुन्हा एकदा आपल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीचं प्रमुख केंद्र बनेल, असं पंतप्रधानांनी सांगितलं. भक्कम मानवी मूल्यांच्या आधारावर उभी असलेली राष्ट्रं, गमावलेलं वैभव परत मिळवत, उज्वल भविष्याचा पाया रचतात, असं सांगत नालंदा विद्यापीठाचं पुनरुज्जीवन भारताच्या सुवर्णकाळाची सुरवात असल्याचं पंतप्रधान म्हणाले. नालन्दा विद्यापीठाचा नवा परिसर भारताच्या सामर्थ्याची ओळख करून देईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला