पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारांदरम्यान काँग्रेसवर आरोपांची राळ उडवून दिली आहे. यापार्श्वभूमीवर गुरुवारीही त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. प्रभू श्रीराम आणि भगवान शंकर यांच्याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या वक्तव्यावर हल्लाबोल करत, विरोधी पक्ष तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
सुरेंद्रनगर आणि भावनगर लोकसभा जागांसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ गुजरातमधील सुरेंद्रनगरमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करीत होते. धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रस्ताव देऊन काँग्रेसने राज्यघटनेचे उल्लंघन केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. काँग्रेसने सरकारी निविदांमध्ये मुस्लिमांना आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे, असा दावाही त्यांनी केला.
मोदी म्हणाले, ‘आता काँग्रेस हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भगवान राम आणि भगवान शिव यांच्या संदर्भात अत्यंत धोकादायक विधान केले आहे. हे विधान दुष्ट हेतूने करण्यात आले आहे. ते हिंदू समाजात फूट पाडण्याचा खेळ खेळत आहेत. याद्वारे ते प्रभू राम आणि शिवभक्तांमध्ये मतभेद निर्माण करीत आहेत. आपल्या हजारो वर्षांच्या परंपरा मुघलांनाही मिटवता आल्या नाहीत आणि आता काँग्रेसला त्या मिटवायच्या आहे का? तुष्टीकरणासाठी काँग्रेस आणखी किती खाली जाणार आहे?’
छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे उमेदवार शिवकुमार दहरिया यांच्या समर्थनार्थ मंगळवारी रॅलीला संबोधित करताना खर्गे म्हणाले होते की, त्यांचे नाव शिवकुमार आहे. ते रामाशी स्पर्धा करू शकतात कारण, ते शिव आहेत. मी पण मल्लिकार्जुन आहे. मी देखील शिव आहे. या विधानावरून मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
‘भारत जोडो’चा समारोप ‘काँग्रेस ढुंडो’ने होईल
बरेली/बदाऊन/सीतापूर (उत्तर प्रदेश) : ‘काँग्रेसचे ‘युवराज’ राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचाराची सुरुवात ‘भारत जोडो यात्रे’ने केली होती. मात्र, ४ जूननंतर तिचा समारोप ‘काँग्रेस ढुंडो यात्रे’ने होईल,’ अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी काँग्रेसला लक्ष्य केले.
बरेलीमधून भाजपचे उमेदवार छत्रपाल गंगवार यांच्या समर्थनार्थ आयोजित जाहीर सभेला ते संबोधित करीत होते. ‘आमच्यासमोर ‘इंडिया’ ही अहंकारी आघाडी निवडणूक लढवत आहे. त्यांचे युवराज राहुलबाबा यांनी ‘भारत जोडो’ यात्रेने निवडणुकीची सुरुवात केली. पण, ४ जूननंतर ‘काँग्रेस ढुंडो’ यात्रेने तिचा समारोप होईल,’ असे ते म्हणाले. ‘दोन टप्प्यांमध्ये काँग्रेस दुर्बिणीतूनही दिसत नसून, नरेंद्र मोदी यांनी शतक ठोकून ४००च्या शर्यतीत ते खूप पुढे गेले आहेत,’ असा दावाही त्यांनी केला.
‘युवराजांना पंतप्रधान पाहण्यास पाक उत्सुक’
आनंद (गुजरात) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काँग्रेसला लक्ष्य करताना, भारतातील सर्वात जुना पक्ष मृत्युपंथाला लागला असताना, पाकिस्तानला ‘युवराजांना’ पंतप्रधानपदी पाहायचे आहे. ते हतबल आहेत, कारण देशाच्या शत्रूंना येथे कमकुवत सरकार हवे आहे, असा आरोप केला
मध्य गुजरातच्या आणंद शहरातील आणंद आणि खेडा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित निवडणूक रॅलीला ते संबोधित करीत होते. काँग्रेसला राज्यघटनेत बदल करून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गाचे (ओबीसी) आरक्षण रद्द करून ते मुस्लिमांना द्यायचे आहे, या आरोपाचाही त्यांनी पुनरुच्चार केला. विशेष म्हणजे, पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर करून त्यांचे कौतुक केले होते. त्यानंतर मोदींनी काँग्रेसला पाकिस्तानवरून लक्ष्य केले आहे.