शिक्षण हक्क कायदयाचे अध्वर्यू राजर्षि छत्रपती शाहू महाराज – अभिजीत कांबळे
Navimumbaiabhijeetkamblenews
नवी मुंबई, 25 जून (हिं.स.) : शिक्षणामुळेच माणसाचा उत्कर्ष होतो हा ठाम विश्वास ठेवत राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा क्रांतीकारी कायदा केला आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. त्याचाच विस्तार सर्वदूर झालेला असून छत्रपती शाहू महाराजांचा हा शैक्षणिक दृष्टीकोन आपण समजून घेतला पाहिजे व त्यांनी आखून दिलेली पायवाट अधिक व्यापक केली पाहिजे, असे मत व्याख्याते, संपादक अभिजीत कांबळे यांनी व्यक्त केले.
राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून से.15 ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात ‘विचारवेध’ या व्याख्यान शृंखलेमध्ये ‘राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचे दूरदृष्टीचे शैक्षणिक विचार’ या विषयावर बीबीसी मराठीचे संपादक तथा व्याख्यातेअभिजीत कांबळे यांनी श्रोत्यांशी संवाद साधत छत्रपती शाहू महाराजांच्या शैक्षणिक विचारांचे महत्व विशद केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण, वाचन, माहिती व ज्ञान यांना महत्व देणाऱ्या विचारांवर आधारित नवी मुंबई महानगरपालिकेने उभे केलेले हे स्मारक खऱ्या अर्थाने ज्ञानस्मारक असून येथील अतिशय संपन्न ग्रंथालय अभ्यासकांसाठी तसेच बाबासाहेबांचे विचार समजून घेण्यासाठी अतिशय उल्लेखनीय असल्याचे मत अभिजीत कांबळे यांनी नोंदविले.
आपले महाराष्ट्र राज्य पुरोगामी असण्याचे मूळ शिक्षणात असून महात्मा फुले यांनी शिक्षणाला महत्व देत शाळा सुरु केल्या, शाहू महाराजांनी शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचा कायदा केला आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात तशी तरतूद केली हा आपला समृध्द वारसाच प्रगतीचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले.
राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या शैक्षणिक विचारांचा अभ्यास करताना पाच महत्वाचे मुद्दे जाणवले असे सांगत त्यांनी शाहू महाराजांनी राबविलेला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा क्रांतीकारी कायदा, स्त्री शिक्षणासाठी सुरू केलेले उपक्रम व कायदे, तत्कालीन अस्पृश्य समाजाच्या विकासासाठी राबविलेले शैक्षणिक उपक्रम व कायदे, संस्थानाच्या अर्थसंकल्पात शिक्षणावरील खर्चाला सहा टक्के इतके दिलेले प्राधान्य तसेच वसतीगृहाच्या चळवळीमुळे गरजू व होतकरु मुलांना खुली झालेली शिक्षणाची दारे या पाच मुद्दयांच्या अनुषंगाने छत्रपती शाहू महाराजांचा शैक्षणिक दृष्टीकोन विविध उदाहरणे देत मांडला.
शिक्षण हक्क कायदयाचे अध्वर्यू राजर्षि छत्रपती शाहू महाराज हे असून त्यांनी राबविलेली शैक्षणिक धोरणे, उपक्रम हे आजच्या काळालाही सुसंगत असून त्यांच्या शैक्षणिक विचारांचा उपयोग आजच्या काळात कसा करुन घेता येऊ शकतो या दृष्टीने विचारमंथन व्हायला हवे असे ते म्हणाले. शिक्षणामुळे सुजाण व चांगला माणूस घडू शकतो आणि शिक्षण हे समाजाला परस्परांशी सद्भावनेने रहायला शिकवते त्यामुळे शिक्षणाला सर्वाधिक महत्व देण्याची गरज असून त्यासाठी छत्रपती शाहू महाराजांच्या शैक्षणिक विकासाच्या नजरेतून पहायला हवे असे श्री. अभिजीत कांबळे यांनी स्पष्ट केले.
नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आपल्या मनोगतात अडीच वर्षात अडीच लाखाहून अधिक नागरिकांनी व मान्यवरांनी स्मारकाला भेट देत येथील सुविधांची मुक्तकंठाने प्रशंसा केली असल्याचा आनंद व्यक्त करीत ‘विचारवेध’ या व्याख्यान शृंखलेच्या माध्यमातून महानगरपालिका सांस्कृतिक व वैचारिक परंपरा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. आत्तापर्यंत या व्याख्यानमालेत दिग्गज व्याख्यात्यांनी मौलिक विचारधन दिलेले असून व्याख्यानांना श्रोत्यांचाही उत्तम प्रतिसाद लाभतो याबद्दल आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.