अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या रूपाने तब्बल २८ वर्षांनंतर ‘पंजा’ने मैदान मारले. त्यापूर्वी १९९१ ते १९९६ या कालावधीत कॉग्रेसच्या तिकिटावर प्रतिभाताई पाटील यांनी अमरावती लोकसभेचे दिल्लीत प्रतिनिधित्व केले. बळवंत वानखडे यांनी ५ लाख २६ हजार २७१ मते घेत महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव केला अन् राणांचे मोदी सरकारमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न भंगले. मात्र, नवनीत राणा यांना आपल्या विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक २६ हजार ७६३ एवढे मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचे यजमान तथा बडनेऱ्याचे आमदार रवी राणा हे यशस्वी ठरले. अमरावती लोकसभेत बडनेरा, अमरावती, तिवसा, दर्यापूर, मेळघाट व अचलपूर असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात विजयी उमेदवार बळवंत वानखडे यांनी
मेळघाट व बडनेरावगळता अन्य चार विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेतले, तर नवनीत राणा यांना मेळघाट व बडनेरा या दोन मतदारसंघात भरभरून मतदान झाले. मेळघाट विधानसभा मतदारसंघात वानखडे यांच्या तुलनेत २१ हजार ५९५ मते अधिक पडली. मात्र, त्यापेक्षाही अधिक मते राणा यांना बडनेरा मतदारसंघात मिळाली. तेथे राणा यांना १ लाख १२४, तर वानखडे यांना ७३ हजार ३६१ मते मिळाली. अर्थात नवनीत राणा – यांना बडनेऱ्याची आमदार रवी राणा यांनी – तब्बल २६ हजार ७६३ इतके विक्रमी – मताधिक्य मिळवून दिले. ते मताधिक्य – मेळघाटच्या तुलनेत अधिक राहिले. राणांनी आपल्या बालेकिल्ल्यात पत्नीला मताधिक्य मिळवून देत पतीधर्म यथार्थ ठरविला.ठाकरे सेनेच्या प्रीती बंड, सुनील खराटे व माजी आमदार धाने पाटील यांनी महाआघाडीच्या उमेदवारांसाठी जोरकस प्रचार केला. मात्र, त्यांच्यातील अंतर्गत सुंदोपसुंदीमुळे ठाकरे गटाच्या प्रयत्नांना मर्यादा आल्या. बडनेरा मतदारसंघाचा किल्ला लढविण्यासाठी काँग्रेसकडे मोठा व लोकप्रिय चेहरा स्थानिक पातळीवर नव्हता. त्यामुळे वानखडे तेथे ७३ हजारांवरच थांबले. अन्य पाचही मतदारसंघाच्या तुलनेत वानखडे यांना बडनेरा मतदारसंघात कमी मते मिळाली.