बार्शी – संभाजी ब्रिगेडच्या बार्शी तालुका कार्यकारिणीची घोषणा उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात येत संघटनेने नव्या इनिंगची सुरुवात केली. प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वात संघटनेचे काम राज्यस्तरावर सुरु आहे. याप्रसंगी नूतन तालुका अध्यक्ष म्हणून संग्राम देशमुख, तर शहराध्यक्षपदी दत्तात्रय जगताप यांची निवड जाहीर करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनलताई दास, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष विक्रांत वानकर, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, सचिन देशमुख, सुजीत लोखंडे, अविनाश जाधव आदी उपस्थित होते.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संभाजी ब्रिगेडच्या कार्याचा आढावा घेत नव्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. समाजहिताच्या दृष्टीने संघटनेचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याचे आवाहनही करण्यात आले. दरम्यान, तालुका संपर्क प्रमुखपदी शंतनू चोपडे, सचिवपदी आदित्य देवेंद्र पाटील, कार्याध्यक्षपदी यशवंत धस, तर युवा संघटकपदी कृष्णा देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्यांमुळे संघटनेच्या संघटनात्मक बळकटीस चालना मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
नूतन तालुकाध्यक्ष संग्राम देशमुख व शहराध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी आपल्या मनोगतातून संघटनेचे काम अधिक जोमाने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. लवकरच संपूर्ण तालुक्यात कार्यकारिणी गठीत करुन संघटनेचा विस्तार करण्यात येणार असून युवकांना संघटनेत जोडत शिक्षण, सामाजिक न्याय, ऐतिहासिक वारसा जतन आणि विविध जनजागृती उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.























