अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची पुण्यात भेट घेतली. यावेळी गजा मारणेने निलेश लंकेंचा सत्कार केला. निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कार स्वीकारला. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी निलेश लंकेंवर जोरदार निशाणा साधला. अहमदनगर लोकसभा निवडणुकीत मदत केल्यानेच निलेश लंके आभार मानण्यासाठी गजा मारणेकडे गेले असावेत, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली होती. आता यावर खासदार निलेश लंके यांनी अमोल मिटकरी यांना उत्तर दिले आहे.
खासदार निलेश लंके यांची कुख्यात गुंड गजा मारणे याच्याशी भेट झाली त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. दरम्यान ही भेट केवळ अपघात होता. मला गजा मारण्याची पार्श्वभूमी माहिती नव्हती, असे स्पष्टीकरण खासदार निलेश लंके यांनी दिले आहे.
निलेश लंकेंचं मिटकरींना उत्तर
तर अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेवर निलेश लंके म्हणाले की, अमोल मिटकरी यांना काही परिस्थिती माहित आहे का? जरा परिस्थितीची जाणीव करून घ्या. पक्षाने मिडियासमोर बोलण्यासाठी ठेवले आहे म्हणून तुम्ही काहीही बोलणार का? असा घणाघात त्यांनी केला आहे.
काय म्हणाले होते अमोल मिटकरी?
शरद पवार गटाचे खासदार निलेश लंकेंनी गुंड गजा मारणेची घेतलेली भेट ही अहमदनगर लोकसभेत त्याने केलेल्या मदतीचे आभार मानायला होती का? गजा मारणेने बारामती आणि नगरमध्ये शरद पवार गटाला मदत केली का? पार्थ पवारांनी मारणेच्या भेटीनंतर अजित पवारांनी केलेल्या कानउघडणीसारखी लंकेंचीही कानउघडणी शरद पवार गट करणार का? असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित करत निलेश लंकेंवर निशाणा साधला.
लंके-मारणे भेटीवर शरद पवार गटाचे स्पष्टीकरण
शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण लंके-मारणे भेटीवर म्हणाल्या की, गजा मारणे गुन्हेगार आहे. याबाबत नीलेश लंके यांना माहिती नव्हती. मी त्यांना ऑफीसकडून संपर्क साधून खुलासा मागितला. यावर त्यांनी सांगितले की, पुण्यात एका पहिलवानाचा मृत्यू झाला. त्यांच्या घरी ते भेट देण्यासाठी गेले होते. तिथं गजा मारणे याने सत्कार केला. मुळात हा व्यक्ती कोण आहे याची महिती लंके यांना नव्हती. त्यांनी यापुढे अशी चूक होणार नाही असं आश्वासन दिलं आहे.