टेंभुर्णी – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या वेळी “नो डीजे, नो डॉल्बी” धोरण राबवून पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातूनच जयंती साजरी करावी, असे स्पष्ट आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी राहुल आत्राम (IPS) यांनी केले.
बैठकीत मार्गदर्शन करताना आत्राम यांनी सांगितले की, जयंती उत्सवात सर्वांनी उत्साहाने सहभागी व्हावे; मात्र कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श ठेवून, प्रेरणादायी वातावरणात पारंपरिक वाद्यांचा वापर करून जयंती साजरी करावी, असेही त्यांनी नमूद केले. कायद्याचे उल्लंघन टाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या बैठकीस टेंभुर्णी, मोडनिंब, बेंबळे, अरण व तुळशी या गावांतील आंबेडकरप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने, पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे तसेच पोलीस अंमलदार व कार्यकर्ते उपस्थित होते.
आंबेडकर जयंती उत्सव शांततेत व पारंपरिक पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने तयारी केली असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशिक्षण प्रभारी अधिकारी आयपीएस राहुल आत्राम यांनी केले आहे.






















