नवी दिल्ली – “आपल्या सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानला सावधगिरीचा चांगला धडा दिला आहे, त्यामुळे आता भारताशी कोणतीही आगळीक करण्यापूर्वी पाकिस्तान दोनदा विचार करेल,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 23 ऑक्टोबर 2025 रोजी राजस्थानमधील जैसलमेर येथे जवानांसोबतच्या ‘बडाखाना’ कार्यक्रमात संवाद साधताना सांगितले.
‘ऑपरेशन सिंदूर’ संपलेले नाही, केवळ थांबवण्यात आले आहे, याचा पुनरुच्चार करताना संरक्षण मंत्र्यांनी पाकिस्तानला सक्त ताकीद दिली की, जर त्याने कोणतीही आगळीक केली तर यापेक्षाही कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. “आपल्या वैमानिकांनी पाकिस्तानला भारताच्या सामर्थ्याचे केवळ एक प्रात्यक्षिक दाखवले आहे. जर संधी मिळाली, तर ते आपली खरी ताकद जगाला दाखवतील,” असे ते म्हणाले.
देशाचे शत्रू कधीही निष्क्रिय नसतात, याकडे लक्ष वेधून राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दलांना नेहमी सतर्क आणि तयार राहण्याचे, तसेच त्यांच्या हालचालींविरुद्ध योग्य आणि प्रभावी पावले उचलण्याचे आवाहन केले.
संरक्षण मंत्र्यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्याच्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दृष्टिकोनाला मूर्त रूप देण्यात सशस्त्र दले कोणती भूमिका बजावू शकतात यावर प्रकाश टाकला.
आपले जवान केवळ सीमांचे रक्षक नाहीत, तर ते राष्ट्र उभारणीचे प्रणेते आहेत. हे शतक आपले आहे; भविष्य आपले आहे आणि आपण आत्मनिर्भरतेच्या दिशेने जी प्रगती केली आहे, त्यामुळे आपले सैन्य निःसंशयपणे जगातील सर्वोत्तम सैन्य बनेल असा मला विश्वास वाटतो, असे त्यांनी सांगितले.सीमेवरील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी पुन्हा एकदा दिली. याच अनुषंगाने संरक्षण सज्जता आणखी वाढवण्यासाठी सरकारने सीमाभागात विकासकामे हाती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताची संस्कृती, सभ्यता आणि मूल्ये यांचे प्रतीक म्हणून बडाखाना परंपरेचे महत्वही त्यांनी अधोरेखित केले. बडा खान्यात प्रत्येकाला समान वागणूक दिली जाते. आपले सैन्यदल म्हणजे विविध धर्म, जाती, भाषा आणि प्रदेशांतील लोकांचे घरच आहे. सैन्य दलात प्रचंड विविधता आहे, बडा खान्यातील एकाच ताटाच्या रुपातही त्याचेच प्रतिबिंब उमटते, आणि म्हणूनच इतर कोणत्याही भोजन समारंभापेक्षा बडा खाना ही श्रेष्ठ परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले.
बडा खान्यात सहभागी होण्यापूर्वी, संरक्षणमंत्र्यांनी जैसलमेर इथे शौर्यवन या एका अद्भूत कॅक्टससह इतर वनस्पती असलेल्या उद्यानाचे (Cacti-cum-Botanical Garden) उद्घाटन केले. शौर्यवन हे उद्यान भारतीय लष्कराचा उपक्रम आहे. या उद्यानाच्या माध्यमातून थरच्या वाळवंटाला एका प्रफुल्लीत ओअॅसिसचे स्वरुप मिळवून देण्याचा प्रयत्न असून, हे उद्यान लवचिकता, पर्यावरण संवर्धन आणि नवोन्मेषाचे प्रतीक आहे.
आपल्या या भेटीत राजनाथ सिंह यांनी भारत रणभूमी दर्शन उपक्रमांतर्गत, जैसलमेर इथल्या शौर्य गंतव्य या युद्ध स्मारकाला भेट देऊन आदरांजलीही अर्पण केली. या स्मारकातील संघर्ष काळातील भारतीय लष्कराच्या शौर्याच्या चिरस्थायी इतिहासाची प्रतीके म्हणून, जतन केलेल्या युद्धासंबंधीचे चषक आणि कलाकृतींच्या विस्तृत संग्रहाबद्दलची माहितीही त्यांनी घेतली. या स्मारकातील होलोग्राफिक लाईट आणि साऊंड शो चे उद्घाटनीय सादरीकरणही त्यांनी पाहिले. हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सादरीकरण असून, यामुळे हे स्मारकस्थळाला आवर्जून भेट द्यावे असे महत्वाचे ठिकाण झाले आहे.
यावेळी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, उप लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह, लष्कराचे सर्व कमांडर आणि भारतीय लष्कराचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उद्या 24 ऑक्टोबर 2025 रोजी संरक्षणमंत्री इतर क्षेत्रांना भेट देणार आहेत, तसेच दक्षिण कमांडच्या क्षमता प्रदर्शन सरावाची पाहणी ते करणार आहेत. यासोबतच ते जैसलमेर इथे आर्मी कमांडर परिषदेलाही संबोधित करणार आहेत.



















