मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे सोमवारी सोलापुरात आले होते. त्यांच्या स्वागताला हजारो मराठा समाजातील बांधव उपस्थित होते. याचवेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रणिती शिंदे या सुद्धा जरांगे पाटील यांच्या स्वागताला आल्या होत्या.
जरांगे पाटील हे कुणाचेही बुके हार स्वीकारत नसल्याचे समजल्यानंतर त्यांनी बुके बाजूला ठेवला आणि भगवा शेला सत्कारासाठी हातात घेतला. यावेळी प्रचंड गर्दी होती. प्रणिती शिंदे यांनी आपल्या हातातील भगवा शेला मनोज जरांगे पाटील यांना देत त्यांचा सत्कार केला. यावेळी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, सकल मराठा समन्वयक माऊली पवार यांच्यासह मराठा बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.