संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदींचा विरोधकांना सल्ला. महिला वर्ग, तरुण, शेतकरी आणि गरीब वर्ग या चार महत्त्वपूर्ण जाती
गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने एकहाती बाजी मारत विरोधकांना पराभवाची धूळ चारली होती. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये चांगले काँग्रेसला यश मिळण्याच अपेक्षा होती. एक्झिट पोल्सकडूनही तसा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, हे सर्व अंदाज फोल ठरवत भाजपने तिन्ही राज्यांमध्ये घवघवीत यश मिळवले. या पार्श्वभूमीवर आजपासून दिल्लीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना पराभवाने खचून न जाता भविष्यात सकारात्मक वृत्तीने काम करण्याचा सल्ला दिला. माझे सर्व खासदारांना आवाहन आहे की, संसदेत तयारी करुन बोला, विधेयकांवर सखोल चर्चा करा, चांगल्या सूचना द्या, असेही त्यांनी सांगितले.
देशातील महिला वर्ग, तरुण, शेतकरी आणि गरीब वर्ग या चार महत्त्वपूर्ण जाती आहेत. त्यांचे सबलीकरण आणि भविष्य सुरक्षित करणाऱ्या योजना तसेच सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणे या धोरणाने चालणाऱ्यांना जनतेकडून भरपूर समर्थन मिळते, हे अलीकडच्या काळात दिसून आले आहे. गुड गव्हर्नन्स ही संकल्पना प्रभावीपणे राबवली की, अँटी इन्कम्बन्सी हा फॅक्टर कालबाह्य ठरतो. देशातील जनतेने नकारात्मक विचारसरणीला नाकारल्याचे विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी दाखवून दिले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
सध्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर मी सांगू इच्छितो की, ही विरोधकांसाठी एकप्रकारे सुवर्णसंधी आहे. त्यांनी संसदेत पराभवाचा राग काढण्याऐवजी त्यापासून धडा घेतला पाहिजे. गेल्या ९ वर्षांपासून अवलंबलेली नकारात्मक प्रवृत्ती सोडून विरोधकांनी सकारात्मकतेने पुढे जायचे ठरवले तर देशाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. त्यांच्यासाठी संधीची नवी कवाडे उघडतील. त्यामुळे विरोधकांनी सकारात्मक विचार घेऊन पुढे यावे. आम्ही १० पावलं पुढे आलो तर तुम्ही १२ पावलं पुढे आले पाहिजे. प्रत्येकाचं भविष्य हे उज्ज्वल आहे. त्यामुळे निराश होण्याची गरज नाही. पण विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा राग संसदेत काढू नका. पराभवामुळे हताशपणा आणि नैराश्य येते. पण मी माझ्या दीर्घ अनुभवाच्या आधारे सांगेन की, तुम्ही स्वत:ची दिशा थोडीशी बदला. केवळ विरोधाला विरोध करणे सोडून द्या. देशहितासाठी सकारात्मक गोष्टींना प्राधान्य द्या. जेणेकरुन विरोधकांविषयी देशात असलेले द्वेषाचे वातावरण प्रेमात बदलेल. देशाला सकारात्मक संदेश देण्यातच तुमचं भलं आहे. विरोधकांची प्रतिमा ही नकारात्मक असणे देशातील लोकशाहीसाठी चांगली गोष्ट नाही, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला.