पुणे, 26 जुलै (हिं.स.)।पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीचा आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शुक्रवारी ( ता. २६) अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर केली आहे.त्यानुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशालेच्या शुक्रवारी ( ता. २६) आणि शनिवारी (ता. २७) होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
या दोन दिवसीय परीक्षेचे पुन्हा नियोजन करून वेळापत्रक लवकरच विद्यापीठ संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिली आहे.विद्यापीठाच्या उर्वरित परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार होतील याची कृपया विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी. याबाबत काही शंका असल्यास संबंधित महाविद्यालयाच्या प्रतिनिधी यांनी तत्काळ परीक्षा विभागाशी संपर्क साधावा.सर्व संलग्नित परीक्षा केंद्राचे प्राचार्य, समन्वयक आणि महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी यांनी या सूचनेची नोंद घेऊन आपल्या स्तरावरून सर्व संबंधित विद्यार्थ्यांना सूचना द्यावी, असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले आहे.



















