सोलापूर : संपूर्ण जीवनात वैयक्तिक संपत्तीचा उपयोग लोकविकासासाठी करून आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या भारतीय इतिहासातील अद्वितीय व्यक्तिमत्त्व असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासनाचे संचालक
डॉ.प्रभाकर कोळेकर यांनी केले. हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर महाविद्यालयात *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आर्थिक व्यवस्था आधुनिक उद्योग शैक्षणिक समन्वयाचा प्रेरणास्त्रोत या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आर्थिक व्यवस्था : आधुनिक उद्योग-समन्वयाचा प्रेरणास्त्रोत’ या विषयावर ते बोलत होते.
डॉ. कोळेकर पुढे म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांनी विविध विकासकामांमध्ये स्थानिक कारागिरांना रोजगार देऊन आत्मविश्वास निर्माण केला. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांनी महिला सबलीकरणाची भक्कम पायाभरणी केली. महसुली वाटपात त्यांनी ६० टक्के हिस्सा राज्याकडे आणि ४० टक्के लोकांकडे असा समतोल बदल घडवून आणला. व्यापार, शहरे व तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. इंदूर येथून राजधानी माहेश्वरला हलवून त्यांनी प्रशासन अधिक लोकाभिमुख केले. महिलांना घोडेस्वारी व शस्त्रप्रशिक्षण देऊन स्वसंरक्षणासाठी सक्षम केले. न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी राजकारणासाठी त्या आजही स्मरणात असल्याचे त्यांनी सांगितले.
या उद्घाटन समारंभास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू मा. प्रा. डॉ. एल. बी. दामा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. स्वागतपर भाषण प्राचार्य डॉ. सत्यजित शहा यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक एमबीए विभागप्रमुख डॉ. प्रीतम कोठारी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्राध्यापिका किरण गुप्ता व संगीता माळी यांनी करून दिला. व्यासपीठावर वालचंद आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. संतोष कोटी, कस्तुरबाई अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अश्विन बोंदार्डे, डॉ.रोहिणी मिसाळ
यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे आभार प्रदर्शन प्राध्यापिका डॉ. रोहिणी मिसाळ यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राध्यापिका ग्रीष्मा देशपांडे यांनी केले. दोन दिवशीय राष्ट्रीय
परिषदेच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक डॉ. घनश्याम होळकर (भरतपूर, राजस्थान) यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आर्थिक प्रणाली’ या विषयावर विचार मांडले. तर मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटी, हैदराबाद येथील स्कूल ऑफ कॉमर्स अँड बिझनेस मॅनेजमेंटचे डॉ. बदिउद्दीन अहमद यांनी ‘महिला सक्षमीकरण आणि आर्थिक सहभाग : ऐतिहासिक उदाहरणे व सद्यस्थितीतील परिणाम’ या विषयावर सखोल विश्लेषण केले.
ही राष्ट्रीय परिषद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोकाभिमुख आर्थिक धोरणांचा आणि आधुनिक विकासाशी असलेल्या सुसंगततेचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली.

























