कळव्यात आज राज ठाकरे यांची सभा होणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार असून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्यात ही सभा होत आहे. त्यामुळे यासभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या सभेचा टीझर शिवसेनेकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. या सभेसाठी मनसे आमदार राजू पाटील आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी जोरदार तयारी केली असून मनसे आणि शिवसेनेकडून मोठं शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे.
‘देशाचे आदरणीय पंतप्रधान मा.ना.श्री. नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाला आणि विकासाला पाठिंबा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मानीय श्री. राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीला एक बळ मिळाले आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी उत्स्फूर्तपणे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यक्रमात सहभाग घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज रविवार, १२ मे रोजी सायंकाळी ६ वाजता खारेगाव येथील ९० फिट रोड येथे सन्माननीय राजसाहेबांची जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेला आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहूया आणि देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन करूया. जय महाराष्ट्र !’, असं कॅप्शन देत श्रीकांत शिंदे यांनी हा टीझर शेअर केला आहे.
मुख्यमंत्रीही सभेला उपस्थित राहण्याची शक्यता
मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले, राज ठाकरे यांची आज संध्याकाळी कळव्यात जाहीर सभा होणार आहे. त्याची तयारी झाली असून १७ तारखेची सभा ही शेवटची असेल. राज यांची सभा म्हटलं की आमचा फॉरमॅट ठरलेला असतो. आढावा घेऊन आम्ही आमच्या कामाला निघतो. मात्र, यावेळेस महायुतीसाठी काम करतोय, पंतप्रधान मोदिंसाठी काम करतोय.
इतर पक्षाची ही साथ मिळते ती सभा जोरात होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच्या कळवा परिसरातील सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या दृष्टीने सर्व पाहतोय. आमचा फोकस आमच्या सभांवर बाकीच्या पक्षाच्या कुठे किती सभा आहे. याच्यामध्ये आम्हाला रस नाही. सभा होत असतात कल्याण मधील १५ तारखेला मोदींची सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सगळ्यांच्या सभा होतात. मात्र आमच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे आमदार पाटील म्हणाले.