अॅनिमल’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी आपल्या बजेटची रक्कम वसूल केली आहे. यात रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
हे वर्ष सरत असताना बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा ‘अॅनिमल’ या सिनेमाचे वादळ आले आहे. संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाने जो चमत्कार केलाय तो आजपर्यंत रणबीर कपूर, अनिल कपूर किंवा बॉबी देओलच्या कोणत्याही चित्रपटाने दाखवलेला नाही. शुक्रवार,१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’ने पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी वर्षाभरातील मोठी ओपनिंग करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच, चाहते रणबीर आणि बॉबीवर फारच प्रभावित झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर अॅडव्हान्स बुकिंगद्वारे या चित्रपटाची क्रेझ स्पष्टपणे दिसून आली. पहिल्या दिवशी ‘अॅनिमल’ने किती कमाई केली ते जाणून घेऊया.
रणबीरच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे. रणबीरचा सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३६.४२ कोटींची कमाई केली होती. कमाईच्या बाबतीत, तो ‘जवान’ वगळता या वर्षातील इतर दोन हिट चित्रपट ‘पठाण’ आणि ‘गदर २’पेक्षा खूप पुढे गेला आहे. Sacnilk च्या अहवालानुसार, ‘ॲनिमल’ने उत्कृष्ट ॲडव्हान्स बुकिंगसह ६१ कोटी रुपयांची ओपनिंग केली आहे. एनसीआरमध्ये या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाच्या ऑक्युपेंसीबद्दल बोलायचे झाले तर, एकूण ६२.४७% आणि रात्रीच्या शोमध्ये ८४.०७% होती.
‘अॅनिमल’ने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा पार केला
चित्रपटाच्या जगभरातील कमाईबद्दल बोलले जात आहे की, पहिल्याच दिवशी त्याने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ने पहिल्या दिवशी भारतात ५७ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने जगभरात १०४.८० कोटींची कमाई केली होती. सनी देओलच्या ‘गदर २’ ने, पहिल्या दिवशी देशभरात ४०.१ कोटींची कमाई झाली होती. तर शाहरुखच्या मागील ‘जवान’ या चित्रपटाने देशभरात पहिल्याच दिवशी ७५ कोटींची कमाई केली होती.
‘अॅनिमल’ने उत्तर अमेरिकेत मोडला रेकॉर्ड, दक्षिणेत सकाळी ६ वाजल्यापासून लोक रांगेत उभे
या चित्रपटातील रणबीरच्या लूकने सर्वांनाच चकित केले आहे. अभिनेत्याने याआधी कधीही अशा प्रकारची भूमिका साकरली नव्हती. बॉबी देओल हा देखील या चित्रपटाचे महत्त्वाचे आकर्षण आहे. हा चित्रपट गुरुवारी, ३० नोव्हेंबर रोजी अमेरिकेत प्रदर्शित झाला आणि उत्तर अमेरिकेत ८.३ कोटी रुपयांची कमाई करून सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटाचा विक्रम केल्याचे बोलले जात आहे. भारताच्या विविध भागात या चित्रपटाची प्रचंड क्रेझ होती. आंध्र प्रदेशातील कुरनूलमध्ये असलेल्या सिनेमा हॉलमध्ये सकाळी ६ वाजल्यापासूनच चाहत्यांची लांबलचक रांग लागली होती. ‘कबीर सिंग’ आणि ‘अर्जुन रेड्डी’ सारखे चित्रपट बनवणाऱ्या संदीप रेड्डी वंगा यांची दक्षिणेत प्रचंड क्रेझ असल्याचे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण जगाला या चित्रपटाचे वेड लागले आहे, असे म्हणण्यात गैर नाही.
‘अॅनिमल’चे बजेट १०० कोटी रुपये
या चित्रपटाचे बजेट जवळपास १०० कोटी रुपये आहे आणि पहिल्याच दिवशीच्या कमाईतून ही रक्कम वसूल झाली आहे. सुमारे ३ तास २१ मिनिटांचा हा चित्रपट देशभरातील सुमारे ४००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील अति हिंसात्मक दृश्यांमुळे तो A सर्टिफिकेटसह पास झाला.