सोलापूर : हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर येथील व्यवस्थापन विभाग व श्री. विद्या इन्फोटेक, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन ‘मास्टरमाईंड – 2025’ या स्पर्धेअंतर्गत इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ‘क्षमता चाचणी’ परीक्षेत वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर (कनिष्ठ विभाग)च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत शहरातील विविध महाविद्यालयांतील एकूण २५२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी केली.
स्पर्धेत विशांत विरकुमार गंधगे याने द्वितीय क्रमांक पटकावून रोख ₹२००० व प्रमाणपत्र, तर कांचन परशुराम जाधव या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळवून रोख ₹१५०० व प्रमाणपत्र असे पारितोषिक मिळवले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी, उपप्राचार्य अनुप म्हेत्रे तसेच पर्यवेक्षक डॉ. जिवराज कस्तुरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे सह-समन्वयक विजय वाघमोडे व धनंजय जिडगीकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
















