अरण – येथील जिजाऊ महिला मंडळ तीर्थक्षेत्र अरण संचलित यशोदा गुरुकुल ह्या शिक्षण संकुलाला मराठवाड्यातील सात मुख्याधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली.
निसर्गरम्य वातावरणात आधुनिक पद्धतीने उभारलेल्या व पर्यावरणपूरक बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या सुंदर इमारतीचे मुख्याधिकाऱ्यांनी कौतुक केले.यशोदा गुरुकुलला नळदुर्ग आणि उमरगा नगरपालिका मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, मुख्याधिकारी धाराशिव नीता अंधारे, मुख्याधिकारी कळंब मंजुषा गुरमे, मुख्याधिकारी वाशी सुरेखा कांबळे, मुख्याधिकारी मुरूम सचिन भुजबळ,मुख्याधिकारी लोहारा लक्ष्मण कुंभार, मुख्याधिकारी तुळजापूर अजिंक्य हरिदास रणदिवे अशा सात नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली.
यशोदा गुरुकुलच्या वर्गांमधील विद्यार्थ्यांची वैशिष्ट्यपूर्ण बैठक व्यवस्था मुख्याधिकाऱ्यांना विशेष आवडली. यशोदा गुरुकुलच्या संस्थापिका सुनीता रणदिवे व मार्गदर्शक हरिदास रणदिवे यांच्याकडून त्यांनी गुरुकुलमध्ये होत असलेल्या दैनंदीन उपक्रमांची माहिती घेतली. गुरुकुलच्या परिसरात लावण्यात व व्यवस्थित वाढविण्यात आलेल्या विविध प्रकारच्या झाडांची त्यांनी माहिती घेतली.
टेबल सॉकर ह्या खेळाचीही त्यांनी आवर्जून प्रात्यक्षिकासह माहिती घेतली. प्रशस्त क्रीडांगण, मुबलक खेळणी व क्रीडासहित्य आणि त्याचा होत असलेला वापर पाहून विद्यार्थ्यांमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
























